|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » दिल्लीतील अनिर्णीत लढतीत लंकेचा नैतिक विजय

दिल्लीतील अनिर्णीत लढतीत लंकेचा नैतिक विजय 

भारतीय फिरकीपटू पुरते निष्प्रभ, तरीही 1-0 फरकाने मालिकाविजय, कोहलीला दोन्ही पुरस्कार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

धनंजया डिसिल्व्हा (219 चेंडूत 119 निवृत्त), रोशन सिल्व्हा (154 चेंडूत नाबाद 74), निरोशन डिकवेला (72 चेंडूत नाबाद 44) व दिनेश चंडिमल (90 चेंडूत 36) यांच्या चिवट फलंदाजीसमोर फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरल्यानंतर यजमान भारतीय संघाला लंकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटीत लढत अनिर्णीत राखण्यावर समाधान मानावे लागले. केवळ नागपुरातील कसोटी जिंकल्यामुळे भारताला 3 सामन्यांची ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकता आली. वास्तविक, 410 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अवघडच होता. पण, तरीही दिवसभर झुंज देत 5 बाद 299 धावांसह त्यांनी या अनिर्णीत लढतीत एका अर्थाने नैतिक विजयच संपादन केला. सक्तीची 7 षटके बाकी असताना दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्यावर सहमती दर्शवली.

कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱया धनंजया डिसिल्व्हाला स्नायूच्या वेदना बळावल्यानंतर 119 धावांवर निवृत्त व्हावे लागले. पण, यानंतरही पदार्पणवीर रोशन सिल्व्हा (नाबाद 74) व निरोशन डिकवेला (नाबाद 44) यांनी धीरोदात्त, संयमी खेळावर भर देत खेळपट्टीवर जणू ठाणच मांडले होते. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 94 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि याचमुळे भारताला दिवसभरातील शेवटच्या सत्रात अगदी एकही बळी मिळवता आला नाही.

वृद्धिमान साहाने रवींद्र जडेजाच्या (38 षटकात 3/81) गोलंदाजीवर डिकवेलाला यष्टीचीत करण्याची नामी संधी दवडली व इथेच भारताच्या कसोटी जिंकण्याच्या आशाअपेक्षांना जोरदार सुरुंग लागला. खेळपट्टी अनुकूल नसेल तर रविचंद्रन अश्विनसारखा आघाडीचा फिरकीपटू देखील कुचकामी ठरतो, हे देखील या कसोटीने सुस्पष्ट केले. अश्विनने 35 षटकात 1 बळी घेतला व यासाठी त्याला 126 धावा मोजाव्या लागल्या. कोटलाच्या खेळपट्टीला अगदी पाचव्या दिवसापर्यंत एकही तडा गेला नाही आणि या परिस्थितीत अश्विनची गोलंदाजी पुरती निष्प्रभ ठरली. अश्विनने येथे दूसरा, कॅरम बॉलसारखी अस्त्रे वापरली. शिवाय, चेंडूचा वेग कमी-जास्त करुन देखील पाहिले. पण, हे सर्व प्रयत्न शब्दशः निष्फळ ठरले.

डिसिल्व्हा, रोशन व डिकवेला यांनी अश्विनच्या चेंडूतील वेगाचा पुरेपूर लाभ घेत सहज धावा जमवण्याचा सपाटा लावला व इथेच पुढील चित्र स्पष्ट झाले. प्रतिस्पर्धी कर्णधार दिनेश चंडिमलचा त्रिफळा उडवला, हे अश्विनचे दुसऱया डावातील एकमेव यश ठरले. एकीकडे, अश्विन पुरता निष्प्रभ ठरत असताना जडेजाने गोलंदाजीत वैविध्य आणत अनेक प्रयोग राबवले. पण, त्याचाही नेहमीचा ‘एक्स-फॅक्टर’ येथे दिसून आला नाही.

खेळाच्या उत्तरार्धात वेदना जाणवत असल्याने निवृत्त व्हावे लागलेल्या डिसिल्व्हाला फूटवर्कमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या वर्षातील सहा कसोटी सामन्यात लंकेला भारताविरुद्ध प्रथमच एखाद्या लढतीत शेवटच्या सत्रापर्यंत झुंज देता आली, हे येथील वैशिष्टय़ ठरले. डिसिल्व्हाने पहिल्या दोन्ही सत्रात अतिशय संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजी पुरती निष्प्रभ केली व कारकिर्दीतील तिसरे शतकही साजरे केले. वेदना जाणवत असताना देखील त्याने 219 चेंडू खेळून काढले. त्याच्या शतकी खेळीत 15 चौकार व अश्विनच्या गोलंदाजीवरील एका षटकाराचा समावेश राहिला. कट व पूलचे अप्रतिम फटके लगावत त्याने आपली खेळी सुरेख सजवली.

चंडिमलला बाद केले असले तरी अश्विन निष्प्रभ ठरला तर दुसरीकडे, जलद व फ्लॅट गोलंदाजीवर भर देणाऱया जडेजाने आपली बहुतांशी षटके अवघ्या 90 सेकंदातच संपवली आणि क्वचितच त्याच्या चेंडूला फिरकी मिळाली. अर्थात, विशेषतः चंडिमलसमोर जडेजा अनेकदा कमनशिबी देखील ठरला. एकदा जडेजाने चंडिमलचा त्रिफळाही उडवला. मात्र, तो चेंडू नोबॉल असल्याचे तिसरे पंच जोएल विल्सनना दिसून आल्यानंतर लंकन कर्णधाराला जीवदान लाभले. डिसिल्व्हा व चंडिमल यांनी येथे पाचव्या गडय़ासाठी 33 षटकात 105 धावांची भागीदारी साकारली होती. या लढतीसह उभय संघातील 3 कसोटी सामन्यांची मालिका संपन्न झाली असून उभय संघ आता दि. 10 रोजी पहिल्या वनडेत आमनेसामने उभे ठाकतील. 3 वनडेनंतर 3 टी-20 सामनेही खेळवले जाणार आहेत.

धावफलक

भारत पहिला डाव : 7/536 घोषित.

श्रीलंका पहिला डाव : सर्वबाद 373.

भारत दुसरा डाव : 5/246 वर घोषित.

श्रीलंका दुसरा डाव : करुणारत्ने झे. साहा, गो. जडेजा 13 (46 चेंडूत 1 चौकार), समरविक्रमा झे. रहाणे, गो. शमी 5 (15 चेंडू), धनंजया डिसिल्व्हा दुखापतीमुळे निवृत्त 119 (219 चेंडूत 15 चौकार, 1 षटकार), लकमल त्रि. गो. जडेजा 0 (3 चेंडू), मॅथ्यूज झे. रहाणे, गो. जडेजा 1 (20 चेंडू), दिनेश चंडिमल त्रि. गो. अश्विन 36 (90 चेंडूत 2 चौकार), रोशन सिल्व्हा नाबाद 74 (154 चेंडूत 11 चौकार), निरोशन डिकवेला नाबाद 44 (72 चेंडूत 6 चौकार). अवांतर 7, एकूण 103 षटकात 5/299.

गडी बाद होण्याचा क्रम

1-14 (समरविक्रमा, 5.5), 2-31 (करुणारत्ने, 15.1), 3-31 (लकमल, 15.4), 4-35 (मॅथ्यूज, 22), 5-147 (चंडिमल, 55).

गोलंदाजी

इशांत शर्मा 13-2-32-0, शमी 15-6-50-1, अश्विन 35-3-126-1, जडेजा 38-13-81-3, मुरली विजय 1-0-3-0, विराट कोहली 1-0-1-0.

Related posts: