|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाईकर देतोहेत वाहतूक नियमांना तिलांजली

वाईकर देतोहेत वाहतूक नियमांना तिलांजली 

शिवाजीराव जगताप/ वाई 

वाई शहरात येणारे पर्यटक शहराच्या मध्यवर्ती भागांत आल्यानंतर वाहतुकीचे नियम पाळतात. एकेरी वाहतूक पार्किंग या बाबतीत सजग असतात, परंतु स्थानिक मंडळी मात्र वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासून स्वैरपणे एकेरी वाहतुकीच्या विरुध्द दिशेने प्रवास करतात. पार्किंग मनाला येईल तिथे वेडेवाकडे करतात त्यामुळे शहरांतील वाहतुक विस्कळीत होवून वाहतुकीचा बोजवारा उडतो. याबाबत ना पालिकेला घेणेदेणे ना पोलिसांना अशी अवस्था झाली आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.

वाई शहरात कृष्णापुलावरुन आल्यानंतर उजव्या बाजुने छत्रपती शिवाजी उद्यानाकडे जाण्याचा एकेरी मार्ग आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय चौक ते किसनवीर चौक तेथून महागणपती चौक अशी एकेरी वाहतुकीची व्यवस्था पूर्वी केली आहे. तशा स्वरुपाचे फलक वाई नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने लावले आहेत, परंतु येरे माझ्या मागल्या याप्रमाणे या फलकांकडे दुर्लक्ष करीत नियमांचे उल्लंघन करुन दुचाकी आणि चारचाकी स्वार मोकाटपणे वाहने घुसवतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणावर दुचाकी पार्क झाल्याने मुळात असलेला रस्ता अरंद होतो आणि एकेरीचे उल्लंघन झाल्यास वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. एस.टी किंवा जड वाहन आल्यास तर मार्ग मिळणे मुश्कील होते. समोरुन आलेल्या वाहनस्वारास चूक दाखवून दिल्यास तुम्ही कोण विचारणार? आमचं आम्ही बघू अशी दुरुत्तरे मिळतात. पर्यायी स्थानिक मंडळीच वाहतुकीच्या कोंडीस जबाबदार रहातात.

किसनवीर चौक, विष्णू मंदीर चौक, महात्मा फुले मंडई, निवास चौक, शिवाजी चौक ते पोस्ट ऑफीस ही गर्दीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी तर होतेच पण प्रसंगी अपघातही घडतात. याकरिता वाहतूक शाखेने लक्ष देणे आवश्यक जरी असले तरी या शाखेकडे पुरता स्टाफ नसल्याने आवश्यक ठिकाणी वाहतूक कॉन्स्टेबल नेमणे अवघड जाते. मध्यंतरी यावर उपाय म्हणून स्वयंसेवक किंवा पोलीस मित्र असावेत अशी व्यवस्था केली जाणार होती परंतु ही बाब प्रत्यक्षात साकार न झाल्याने वाहतुकीला शिस्त लावणे अवघड झाले, मात्र काही होमगार्डसची नेमणूक करण्यात आली असती तरी त्यांचा म्हणावा असा प्रभाव पडत नाही.

वाहतूक थांबणे, जाम होणे ही वाईकरांना आता नित्याची बाब झाली आहे. परंतु यावर उपाय निघावा असा ज्येष्ठ आणि सुजाण नागरिकाची इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना चालतच आपली कामे करावी लागत असल्याने त्यांनाही या वाहतुक कोंडीचा प्रचंड मनःस्ताप सोसावा लागतो.

Related posts: