|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » म’श्वर पर्यटनस्थळाचे नाव देशात गाजणार

म’श्वर पर्यटनस्थळाचे नाव देशात गाजणार 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात महाबळेश्वर पालिका उत्कृष्ट कामगिरी करीत असुन या स्पर्धेत यशस्वी ठरल्यास देशात या पर्यटनस्थळाचा नावलौकिक वाढणार आहे. पर्यटन स्थळाचे नाव देशात गाजणार असुन त्याचा फायदा येथील पर्यटन वाढीवर होण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेमुळे महाबळेश्वरचा चेहरामोहराच बदलुन जाणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी पालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी एकीकडे अहोरात्र मेहनत घेत आहेत. सेवाभावी संस्था स्वच्छ सर्व्हेक्षणचे काम करित असतानाच येथील मोठी हॉटेल इंडस्ट्री पालिकेला म्हणावे असे सहकार्य करीत नाही. त्यामुळे आम्हाला हॉटेलवर दंडात्मक कारवाई करावी लागत आहे, अशी खंत व्यक्त करून आज हॉटेल भारतला दंड करण्यात आल्याचेही नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱयांनी सांगितले. हॉटेल मालक चालक यांची वारंवार बैठका घेवुन याची कल्पना दिली. यापुढे हॉटेलमधील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करा, उघडय़ावर कचरा टाकु नका असे सांगितले. मात्र पालिकेच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणा अंतर्गत शहराची पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दरम्यान नागरिकांना कमिटीचे सदस्य सर्व्हेक्षणाबाबत प्रश्न विचारणार आहेत. यावेळी नागरिकांनी जर नकारात्मक उत्तरे दिली तर त्यांचा गुणांवर परिणाम होणार आहे. म्हणुन लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रसार व प्रचार करण्यासाठी शहरातुन ध्वनीक्षेपकावरून सर्व्हेक्षणाबाबत माहिती देण्यात येत आहे.

विविध संस्थांचा पुढाकार

झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेने दोन वेळा या अभियान सहभाग घेवुन शहरातुन स्वच्छता फेरी काढली होती. या संस्थेप्रमाणेच गावातील रोटरी क्लब, लायन्स क्लब यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही नगराध्यक्षा शिंदे व मुख्याधिकारी दगडे पाटील यांनी केले.

Related posts: