|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » श्रींच्या पालखी मिरवणुकीत झाला श्रीराम नामाचा गजर

श्रींच्या पालखी मिरवणुकीत झाला श्रीराम नामाचा गजर 

प्रतिनिधी / दहिवडी

श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 104 व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली अन् श्रींच्या पालखी मिरवणुकीत श्रीराम नामाचा गजर सुरु झाला. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱया या पालखी सोहळ्य़ातही भाविक देहभान विसरुन तल्लीन होत आहेत.

श्री क्षेत्र गोंदवले (ता.माण) येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 104 व्या पुण्यतिथी महोत्सवाला सोमवारी पहाटे कोठीपुजनाने सुरुवात झाली. दहा दिवस चालणाऱया या महोत्सवानिमित्त श्रींच्या पादुका व प्रतिमेची रोज सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात येत आहे. सकाळी दहाच्या सुमारास समाधी मंदीरात श्रींच्या पादुका व प्रतिमेचे पुजन करण्यात आल्यानंतर श्रीराम नामाचा एकच जयघोष झाला.मंगलमय वातावरणात भाविकांनी रघुपती राघवचा जयघोष सुरु केला आणि श्रींच्या पादुका व प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये स्थानापन्न करण्यात आल्या. भक्तीभावात न्हावुन निघालेल्या भाविकांच्या चैतन्यात अधिकच भर पडली.पुन्हा रामनामाचा जयघोष करत हा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. अग्रभागी श्रींचा बत्ताशा घोडा ताल धरुन नाचत होताच. पताकाधारी भाविकही रघुपती राघवच्या सुरातील अभंगात तल्लीन झाले होते. पालखीपुढे टाळ मृदंगाच्या साथीने भजनी मंडळ देखील अभंगात चिंब झाले होते. तरुणाईची देखील पालखीसमोर पाटाच्या पायघडय़ा घालण्याची सेवा लगबगीने सुरु होती.मोठय़ा भक्तीमय वातावरणात हळुहळु पालखी सोहळा पुढे सरकत होता. या पालखी मिरवणुकीत ग्रामस्थांचादेखील उत्साह दिसत होता. पालखी मार्गावर जागोजागी पालखीतील पादुका व प्रतिमेला ओवाळुन महिला दर्शन घेत होत्या.संपुर्ण पालखी मार्ग फुलांच्या रांगोळ्यानी सजुन गेला होता.मुख्य आप्पा महाराज चौकातुन हा पालखी सोहळा धाकटे श्रीराम मंदीराजवळ येवुन विसावला.येथील श्रीदत्त, नृसिंह, लक्ष्मी मंदिरात आरती होवुन पालखी पुन्हा मार्गस्थ झाली.मानाच्या गावकऱयांनी पालखीधारकांचे पाय धुवुन पालखीचे स्वागत केले.थोरले श्रीराम मंदिरात पालखी आल्यानंतर पुन्हा आरती झाली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अश्विनी अंगराज कट्टे व सदस्यांच्या हस्ते पुष्पहार घालुन पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी अमोल पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. श्रींची पालखी मिरवणुक पुन्हा समाधी मंदिरात आल्यानंतर सुवासिंनींनी औक्षण केले. त्यानंतर श्रीरामाच्या जयघोषात पुन्हा पालखी समाधी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. 12 पर्यंत हा महोत्सव सुरु आहे.

Related posts: