|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोडली खाणीवरील दुर्घटना निष्काळजीपणातून

कोडली खाणीवरील दुर्घटना निष्काळजीपणातून 

प्रतिनिधी/ कुडचडे

 

कोडली येथील सेसा-वेदांत कंपनीच्या खाणीवर दुर्घटना घडून त्यात मनोज अनंत नाईक याला मृत्यू येण्याचा जो प्रकार घडला त्याची चौकशी होण्याची गरज आहे. सदर घटनास्थळ पाहिले, तर हा अपघात नसून निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचे दिसून येते. कारण मिळालेल्या माहितीप्रमाणे मनोजच्या अगोदरच्या पाळीतील कामगारांनी सदर जागेवर भेगा पडल्यामुळे काम करण्यास नकार दर्शविला होता. तरीही पर्यवेक्षकाने मनोजला त्या जागेवर का पाठविले या प्रश्नाचे उत्तर कंपनाने द्यावे. त्या दिवशी पर्यवेक्षकाने कामाच्या जागी असलेल्या धोक्याबद्दल सूचित केले असते, तर मनोज आज जिवंत असता. याबद्दल सदर पर्यवेक्षकावर तसेच अन्य संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी मयत मनोज याचे कुडचडेतील मामा आपा नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कंपनीने मागण्यांची पूर्तता न केल्यास आपण कोडली खाणीच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज नाईक याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लागणारे सोपस्कार करण्यासाठी नाईक कुडचडे पोलीस स्थानकात आले होते. कोडली येथील सदर खाणीवर शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडून त्यात मनोज हा काम करताना रिपर मशिनसह गाडला गेला होता. मनोज हा घरी एकटाच कमाविणारा होता. तसेच तो सेवेत कायम झाला होता व पुढील 20 वर्षे त्याला त्याच कंपनीत काम करायचे होते. अश परिस्थितीत कंपनीने त्याची पत्नी, दोन मुले व अन्य कुटुंबियांच्या भवितव्याचा विचार करावा व जबाबदारी घ्यावी, अशी मागणी आपा नाईक यांनी यावेळी केली.

बचाव सामग्री कशी नाही ?

राष्ट्रीय ख्यातीच्या सदर कंपनीकडे आपत्कालीन प्रसंगाच्या वेळी वापरण्याकरिता कोणतीच बचाव सामग्री नसावी ही शरमेची गोष्ट आहे. सुरक्षा सप्ताहात सहसा सेसा-वेदांत कंपनीलाच पहिले बक्षीस देण्यात येते. याचा अर्थ असा होतो की, जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा या कंपन्या डोळय़ांना पाणी लावण्यासाठी भाडेपट्टीवर सर्व सामग्री आणून ठेवत असाव्यात अन्यथा येणारे अधिकारी पूर्ण खातरजमा केल्याशिवाय अशी बक्षिसे जाहीर करत असावेत. बचाव सामग्री नसताना या कंपनीला उत्खननाचे हे धोकादायक काम करण्याची परवानगी कोणत्या आधारे दिली गेली, असा सवाल नाईक यांनी यावेळी उठविला.

इतका पोलीस बंदोबस्त का ?

मनोज नाईक याचे फक्त कुटुंबीय घटनास्थळी शोध मोहिमेला वेग देण्याची विनंती करण्यासाठी आले होते तेव्हा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का मागविण्यात आला, असा सवालही त्यांनी केला. दुर्घटना घडल्यानंतर दुसऱया दिवशीही कंपनीने शोध मोहिमेत आवश्यक तत्परता दाखविली नाही. जेव्हा मनोजच्या गावातील लोक कंपनीच्या गेटवर हजर झाले तेव्हा म्हणजे तिसऱया दिवसापासून शोध मोहिमेला जोर आला, असा दावा नाईक यांनी केला.

प्रत्येक राजकीय नेता निवडणुकीच्या अगोदर मतदारांच्या घरी फेऱया मारत असतो. मात्र अशा घटना घडतात तेव्हा त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. दुर्घटनेला चार दिवस झाले, पण आमदार दीपक पाऊसकर वगळता अन्य कोणीच आणि खास करून मंत्र्यांनी या घटनेबद्दल ब्र सुद्धा उचारलेले नाही, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारात लक्ष घालून मनेजच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. तसेच यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

घटनास्थळी कंपनीने पत्रकारांना प्रवेश नाकारण्याच्या प्रकारावरही नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. मनोजचा मृतदेह लवकर सापडला याचे कारण आम्ही तिथे थांबून होत असलेल्या हालचालींची माहिती प्रसिद्धी माध्यमांना पुरविली. ती प्रसिद्ध झाल्याने दबाव येऊन कंपनीला शोध मोहिमेवर जोर द्यावा लागला, असे ते म्हणाले.

दरम्यान, शवचिकित्सा बुधवारी पूर्ण होऊ न शकलेली नसून ती पूर्ण झाल्यावर आज गुरुवारी मनोज नाईकचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात येईल, असे कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी स्पष्ट केले.

Related posts: