|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कांदोळीत लागवड केलेला 10 लाखांचा गांजा जप्त

कांदोळीत लागवड केलेला 10 लाखांचा गांजा जप्त 

 

प्रतिनिधी/ म्हापसा

कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे गांजाची लागवड करणाऱया मळय़ावर छापा घालून अंमलीपदार्थ बनविण्याच्या आरोपाखाली सुशांता शाहू (26) व प्रवास सलाम (20) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी जमीनमालक लॅनी फिओला यांच्याविरोधातही गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी 10 किलो गांजाची पाने जप्त केली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 10 लाख रुपये आहे.

याबाबत निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदोळी आराडी येथे गांजाची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात येते, अशी माहिती कळंगुट पोलिसांना सूत्रांनी दिल्यावर निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिताराम मळीक, शिपाई योगेश बोर्डेकर, गणपत तिळोजी, ब्रह्मानंद पोळजी यांनी आराडी येथे फिओला याच्या निवासस्थानाजवळ असलेल्या गांजाच्या बागेत छापा घातला. येथे मोठय़ा प्रमाणात गांजाची लागवड करण्यात येत होती. या बागेत सुशांता शाहू व प्रवास सलाम बागेत पाणी देण्याचे काम करीत होते.

हा गांजाचा मळा आराडी कांदोळी येथील लॅनी फिओला यांच्या मालकीच्या जमिनीत असल्याने अंमलीपदार्थ कायदा 1985 कलम (20) अ अन्वये लॅनी फिओला याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हा गांजा लपवून ठेवण्यात आला होता ती खोली पोलिसांनी सीलबंद केली आहे.

उपअधीक्षक नेल्सन आल्बुकेअर, आयपीएस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिवबा दळवी व उपनिरीक्षक सिताराम मळीक अधिक तपास करीत आहेत.

सुरीहल्ला प्रकरणी अटक, सुटका

दरम्यान, मरड-म्हापसा येथे उभे असता संदेश गावकर (रा. कुमयेवाडा थिवी सिरसई) यांच्यावर सुरीहल्ला केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी कॅजिटन डायगो आल्मेदा याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. हा सुरीहल्ला प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: