|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त कस्टम विभागाची कारवाई

दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त कस्टम विभागाची कारवाई 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाच्या तज्ञ पथकाने केलेल्या कारवाईत 19 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. हे सोने 696 ग्रॅम वजनाचे असून अज्ञात हवाई प्रवाशाने हे सोने विमानातील आसनाच्या पॉकेटमध्ये लपवले होते. त्या प्रवाशाचा पत्ता लागलेला नाही. हे सोने दुबईहून गोव्यात आणण्यात आले होते.

काल बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर कस्टमच्या पथकाने नियमित पाळत ठेवत असताना धावपट्टीवर दाखल झालेल्या विमानाची तपासणी केली असता या विमानात त्यांना सोन्याच्या 6 कांडय़ा आढळून आल्या. प्रत्येकी दहा तोळय़ाच्या या कांडय़ा विमानातील सिटच्या पॉकेटमध्ये लपवण्यात आल्या होत्या. या सोन्यावर एकाही प्रवाशांने दावा केला नाही. कस्टम अधिकाऱयांनी हे सोने जप्त केले आहे.

गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त जी. बी. सांतीमानो यांच्या देखरेखीखाली अधिकाऱयांनी ही कारवाई केली. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या सर्वकष मार्गदर्शनाखाली या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

कस्टम अधिकाऱयांच्या तावडीत सापडण्याच्या भितीनेच अज्ञात प्रवाशाने ते सोने सिटमध्ये ठेवले असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या विमानांतील प्रवाशांकडून विदेशातून आणलेले तस्करीचे सोने विमानाच्या शौचालयात किंवा सिटखाली लपवून नामानिराळे राहण्याचे प्रकार घडलेले आहेत.

Related posts: