भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांची राहुल गांधींवर टीका

अहमदाबाद
राहुल गांधी हे गुजरातमध्ये जानवेधारी हिंदू असतात तर उत्तर प्रदेशात ते मौलाना असतात, अशी बोचरी टिका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुजरातमध्ये प्रचार सभांमध्ये बोलताना केली आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी आपला उल्लेख सोमनाथ मंदिराच्या नोंदणी वहीत अहिंदू असा केला होता. मात्र नंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी हे केवळ हिंदू नाहीत तर जानवेधारी हिंदू आहेत, असे सांगत या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता.
त्या संदर्भात पात्रा यांनी राहुल गांधींची खिल्ली उढविली. जसे वातावरण असेल तसे राहुल गांधी रंग बदलतात. मुस्लीम बहुल ठिकाणी ते मौलाना असतात तर गुजरातसारख्या राज्यात जानवेधारी हिंदू म्हणून मिरवितात, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेसच्या या धोरणामुळे देशाचे नुकसान होत आहे. अशा पक्षाला गुजराती जनतेने आपल्यापासून दूर ठेवावे. भाजपच्या काळातच गुजरातमध्ये विकासाची द्वारे उघडली गेली आहेत. त्यामुळे गुजरातची जनता भाजपच्याच पाठीशी उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.