|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर नानावाडी शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

अखेर नानावाडी शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन 

शाळा वाचविण्यासाठी विविध संघटना-सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी मराठी शाळा वाचविणे आवश्यक आहे. नानावाडी शाळा वाचविण्यासाठी विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यामुळेच आज या ठिकाणी शाळेची इमारत उभारण्यात येत आहे. ही शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकांनी एका मुलाला या शाळेत दाखल करावे, असे आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी केले.

नानावाडी येथील प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक 37 च्या विद्यार्थ्यांसाठी इमारत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून त्यांची परवड सुरू होती. शाळेकरिता इमारत बांधण्यासाठी जागा नव्हती. जागा मिळविण्याकरिता तीन वर्षांपासून लढा सुरू होता. अखेर या लढय़ाला यश आल्याने शाळा इमारतीचे भूमिपूजन बुधवारी आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. इंग्रजी शाळांमध्ये मुलांना दाखल करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अशामधूनही आपल्या मातृभाषेची ओढ असलेले पालक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवित आहेत. हे कौतुकास्पद आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

 इमारत बांधण्यासाठी आमदार संभाजी पाटील यांनी आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंजूर केला आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. आर. संपगावी यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नगरसेवक अनंत देशपांडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

 मोरारजी देसाई यांच्या हस्ते 1941 मध्ये शाळेचे उद्घाटन

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते 1941 मध्ये शाळेचे उद्घाटन झाले होते. पण शाळेसाठी स्व-मालकीची जागा नसल्याने इमारत बांधण्यात आली नव्हती. सदर शाळा भाडेतत्त्वावरील इमारतीमध्ये 76 वर्षांपासून भरविण्यात येऊनदेखील स्व-मालकीच्या इमारतीसाठी शिक्षण खात्याने कोणतीच दखल घेतली नव्हती. बऱयाच वर्षांपासून एकाच ठिकाणी शाळा भरविण्यात आल्याने इमारत रिकामी करण्याची सूचना इमारत मालकाने शिक्षण खात्याला केली होती. तरीदेखील शिक्षण खात्याने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. यामुळे शाळेच्या इमारतीसाठी शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी लढा छेडला होता. शाळेकरिता इमारत बांधण्यासाठी प्रशासनाने जागा मंजूर करावी, याकरिता निवेदन व आंदोलन छेडण्यात आले होते. यामुळे बुडाच्या मालकीची 4 गुंठे जागा इमारतीकरिता मंजूर करण्यात आली होती. याकरिता आमदार संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले होते.

यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक, गटशिक्षणाधिकारी बी. एम. नलतवाड, मुख्याध्यापक व्ही. आर. संपगावी, अशोक अक्कीसागर, विद्या पाटील, विद्या होंगल, शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षा फातिमा मुल्ला, राकेश कलघटगी, उज्ज्वला पाटील आदींसह शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.  

Related posts: