|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अज्ञात वाहनांच्या धडकेत दोन ठार

अज्ञात वाहनांच्या धडकेत दोन ठार 

प्रतिनिधी/ संकेश्वर

 भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री 1.15 च्या सुमारास सोलापूर फाटय़ानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला. सचिन शंकर बोने (वय 35, रा. खोतवाडी, जैन गल्ली, हातकणगले) असे मृताचे नाव आहे. तर अन्य एका अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मंगसुळी ता. पं. सदस्याचा मृत्यू झाला. मल्हारी कल्लाप्पा वाघमोडे (वय 34) असे मृताचे नाव आहे. तसेच या अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

 संकेश्वर-सोलापूर फाटय़ानजीक अपघातातील मृत सचिन हा बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे राहणाऱया आपल्या आजीला भेटण्यासाठी मंगळवारी दुपारी आला होता. तो परत हातकणगलेकडे जाण्यासाठी सोलापूर फाटय़ानजीक राष्ट्रीय महामार्गवर थांबला होता. त्यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. काही क्षणातच त्याची प्राणज्योत मालवली.

 सचिन हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील रहिवासी आहे. गेल्या 13 वर्षापासून रोजगारासाठी हातकणगले येथील फाँड्रीत काम करीत होता. अधून-मधून तो आपल्या आजीला भेटण्यासाठी येत होता. मंगळवारीही त्याने घरी न सांगताच आपल्या आजीला भेटण्यासाठी आला होता. पण तो निघण्यापूर्वी आपल्या आईला फोनवरून मी कामावरून उशिरा येतो, असा निरोप दिला होता, असे समजते.

 मध्यरात्री पुंजलाईड कंपनीच्या हायवे पेट्रोलिंग पथकाच्या निदर्शनास मृतदेह आढळताच त्यांनी तातडीने संकेश्वर पोलिसांना सदरची माहिती दिली. शववाहिकेतून मृतदेह शवगृहात हलविण्यात आला. बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत संजयच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

 

मंगसुळीत अपघातात  ता. पं. सदस्याचा मृत्यू

मंगसुळी : अज्ञात वाहनाच्या धडकेत येथील रहिवासी व तालुका पंचायत सदस्य मल्हारी कल्लाप्पा वाघमोडे (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नायकू मुरारी वाघमोडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

   याबाबत अधिक माहिती अशी, मल्हारी व नायकू हे दोघेही मिरजहून रात्री 1 वाजता परत घरी येत असताना खंडोबा मंदिर ते लक्ष्मीवाडी दरम्यान अज्ञात वाहनाने दोन्ही दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे नायकू हा रस्त्याकडेला फेकल्यामुळे त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला व पायाला जबर दुखापत झाली. तर जवळच असलेल्या मल्हारी यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले.

 सदर घटनेची माहिती गावात समजताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण सदर वाहन आढळून आले नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मल्हारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शाळा व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली आहे. 

Related posts: