|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ढगाळ वातावरणाने वाढली ‘धाकधूक’

ढगाळ वातावरणाने वाढली ‘धाकधूक’ 

वार्ताहर\ निपाणी

 निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात सध्या ऊसतोड गतीने सुरू आहे. तंबाखू पिकाची भरणी होऊन उत्पन्न वाढीचा काळ साधण्यासाठी शेतकरी पाणी देण्याबरोबरच आंतरमशागतीच्या कामात मग्न आहे. काही ठिकाणी माळमुरड शिवारातील तंबाखूची कापणीही केली जात आहे. अशा परिस्थितीत ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस होण्याची भीती वाढली आहे. यामुळे शेतकऱयांची चिंतेतून ‘धाकधूक’ वाढत आहे.

 निपाणी परिसरात पाणी सुविधेतून हरितक्रांती होत असली तरी आजही येथील शेतकरी पैशाचे हुकमी पीक म्हणून तंबाखूचेच उत्पादन घेतो. या परिस्थितीमुळे येथील तंबाखू उत्पादन क्षेत्र आजही अधिक आहे. यंदा तंबाखू लावणीच्या ऑगस्ट महिन्यात योग्य हवामानाची साथ शेतकऱयांना मिळाली. पण नंतर ऐन वाढीच्यावेळी मात्र पावसाने झोडपून काढल्याने तंबाखू पिकाचे पाणी लागून मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्याचे गाजर दाखवत महसूल विभागाने सर्व्हेही केला. पण आजतागायत एक दमडीही नुकसानीपोटी शेतकऱयांच्या पदरी पडलेली नाही.

 थंडीचे दिवस हे तंबाखूसाठी सोनियाचे दिवस समजले जातात. जेवढी अधिक थंडी तेवढी तंबाखूची भरणी अधिक होते. या स्थितीला पूरकस्थिती निर्माण होताना थंडी वाढलीही होती. पण गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होऊन उष्णतेचा पारा वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस होण्याची भीती वाढताना धाकधूक वाढीला कारण ठरत आहे. अशावेळी अवकाळीचा तडाखा बसल्यास तंबाखू उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची चिंता वाढत आहे.

यंदा उसाला समाधानकारक दर मिळाला आहे. यातून उत्पादन घटीतून होणारे नुकसान भरून निघण्यास काहीशी मदत होणार आहे. पण सध्याचे ढगाळ वातावरण तंबाखूबरोबरच ऊस उत्पादकांची चिंता वाढविण्यास कारण ठरत आहे. अवकाळी झाल्यास ऊस तोडीवर विपरित परिणाम होऊन शेतकरी अडचणीत येणार आहेच. पण त्याचबरोबर कारखान्यांचा गळीत हंगामही अडचणीत येणार आहे. याचप्रमाणे इतर पिकांनाही ही स्थिती नुकसानीला कारक आहे. यासाठी शेतकरी चिंताग्रस्त बनताना मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून पावसाच्या स्थितीचा अंदाज घेत असल्याचे दिसत आहे.

Related posts: