|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुलींच्या वसती शाळेसाठी 17 कोटी 20 लाख मंजूर

मुलींच्या वसती शाळेसाठी 17 कोटी 20 लाख मंजूर 

प्रतिनिधी/ निपाणी

 सध्या स्पर्धात्मक युगात शिक्षण ही प्रत्येकाची गरज आहे. मात्र गरिब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन निपाणी मतदारसंघात मुलींच्या वसती शाळेसाठी समाज कल्याण खात्याकडून 17 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून हंचिनाळ-केएस येथे सर्वसुविधांनीयुक्त अशी वसतीशाळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.

 येथील बिरेश्वर संस्थेच्या शाखेत आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, गरिब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मोरारजी देसाई वसतीशाळा मंजूर करून आणली. त्याचबरोबर मुलींसाठी स्वतंत्र वसतीशाळा असावी यासाठी 2014-15 व 2015-16 मध्ये कित्तूर राणी चन्नम्मा वसतीशाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार समाजकल्याण खात्यातर्फे 17 कोटी 20 लाख मंजूर झाले आहेत. हंचिनाळ-केएस येथे हायटेक वसतीशाळा उभारण्यात येणार आहे.

 यासाठी आडी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात हंचिनाळ-केएस हद्दीत सर्व्हे नं. 92 मध्ये एकूण 18 एकर 34 गुंठे जागेपैकी 10 एकर जागा वसतीशाळेसाठी मंजूर केली असून सदर जागा समाजकल्याण खात्याच्या नावे झाली आहे. सध्या निपाणीत श्रीपेवाडी रोडवरील हालसिद्धनाथ मंदिरानजीक भाडय़ाच्या जागेत गेल्यावर्षीपासून वसतीशाळा सुरू झाली आहे. सदर वसती शाळेत 6 वी ते 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार असून एकूण विद्यार्थी क्षमता ही 250 इतकी असणार आहे. यंदा सहावीच्या वर्गासाठी 50 मुलींनी प्रवेश घेतला आहे.

 नियोजित वसतीशाळेत हायटेक पद्धतीचे क्लासरुम, ग्रंथालय, प्रयोगशाळा, शौचालय आदी सर्व सुविधा असणार आहेत. सध्या गव्हाण येथे सुरू असलेल्या मोरारजी देसाई वसती शाळेचे बांधकाम गतीने सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होणार आहे. तसेच नव्याने मंजूर झालेल्या मुलींच्या वसतीशाळेसंदर्भात लवकरच निविदा मागवून कामास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर मुलींच्या शाळेसाठी 75 टक्के मागासवर्गीय व 25 टक्के सामान्य प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शहर भाजपाध्यक्ष जयवंत भाटले, प्रा. विभावरी खांडके, जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, हालशुगर संचालक समित सासणे, नगरसेवक दत्ता जोत्रे, विजय टवळे, निता बागडे, प्रणव मानवी यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Related posts: