|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कुंपणावरचे नेते आणि भविष्याचा चेहरा!

कुंपणावरचे नेते आणि भविष्याचा चेहरा! 

सत्तेशिवाय काही माणसं जगू शकत नाहीत. गुजरातमध्ये भाजपला सत्ता मिळाली तर काँग्रेसमधील अनेक विद्यमान मंत्री भाजपमध्ये उडी मारण्यासाठी सध्या कुंपणावर बसले आहेत. जर निकाल काँग्रेसला अनुकूल लागला तर भाजपमधील अनेक नेते काँगेसमध्ये यायच्या तयारीत आहेत. याची पूर्ण कल्पना दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर यांच्यातील संघर्षाला लगाम लावण्याचे काम पक्षाच्या हायकमांडने हाती घेतले आहे. पक्षाचे कर्नाटक प्रभारी खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी उभय नेत्यांमधील रुसवेफुगवे दूर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले आहेत. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत रुसवेफुगवे काँग्रेसला परवडणारे नाहीत हे तितकेच खरे आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने तर ‘परिवर्तन यात्रे’च्या माध्यमातून जणू निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. अशा परिस्थितीत जोमाने कामाला लागण्याऐवजी एकमेकांचे वाभाडे काढण्यातच धन्यता मानणाऱया काँग्रेस नेत्यांना हायकमांडने फटकारले आहे. देशभरात भाजप आणि पर्यायाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची लाट असताना कर्नाटकात पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागावे लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत सिद्धरामय्या सरकारने राबविलेल्या लोकप्रिय आणि भाग्यशाली योजनांची माहिती तळागाळात पोहचविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. हा दौरा पूर्णपणे सरकारचा आहे. आम्ही पक्ष म्हणून दुसरी स्वतंत्र यात्रा काढणार ही प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर यांची भूमिका होती. त्यामुळेच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून रस्सीखेच सुरू होती. हा संघर्ष पक्ष किंवा सरकारला परवडणारा नव्हता. त्यामुळेच हायकमांडने त्यावर मलमपट्टी करण्यासाठी के. सी. वेणुगोपाल यांना कर्नाटकात धाडले.

खरे तर आता साऱयांच्या नजरा गुजरात निवडणुकीवर खिळल्या आहेत. गुजरातचा निकाल जाहीर झाल्यानंतर कर्नाटकाच्या राजकारणावरही त्याचे परिणाम जाणवणार आहेत. जर गुजरातमध्ये भाजपला सत्ता मिळाली तर काँग्रेसमधील अनेक विद्यमान मंत्री भाजपमध्ये उडी मारण्यासाठी सध्या कुंपणावर बसले आहेत. जर गुजरातचा निकाल काँग्रेसला अनुकूल ठरणारा लागला तर भाजपमधील अनेक नेते काँगेसमध्ये यायच्या तयारीत आहेत. याची पूर्ण कल्पना दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे. निवडणुका जवळ आल्या की, जे कुंपणावर बसतात त्यांचा उद्देश सत्ता हाच असतो. सत्तेशिवाय काही माणसं जगू शकत नाहीत. अशा नेत्यांना पक्षीय राजकारणापेक्षाही सत्ताकारण महत्त्वाचे असते. सध्या कर्नाटकात हेच चित्र पहायला मिळत आहे. जे कुंपणावर आहेत ते मौन पाळून आहेत. खाजगी कंपन्या आणि वाहिन्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून आपल्या मतदारांचा कानोसा घेण्याचे प्रयत्न कुंपणावरील नेते करीत आहेत. पूर्वी लोकप्रियता, पक्षासाठी त्या उमेदवाराने केलेली कामे, वर्चस्व आदींचा विचार करून उमेदवारी दिली जायची आता साऱयाच पक्षांनी निवडणूक ‘जिंकणे’ या एकच निकषावर उमेदवारी देण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील अनेकांना उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची खात्री नाही. अशा परिस्थितीमुळेच कुंपणावरील नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. येडियुरप्पा यांच्यावर नाराज असणारा एक मोठा गट जसा भाजपमध्ये आहे. तसाच एक मोठा गट काँग्रेसमध्येही आहे. सिद्धरामय्या यांच्या हुकूमशाहीवर अनेक विद्यमान आमदारांच्या मनात प्रचंड नाराजी आहे.

राजकारणात नेहमी नवनवीन प्रयोग होत असतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नेते नवीन आणि धक्कादायक प्रयोगासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक राज्यात त्यांनी केलेले प्रयोग यशस्वीही ठरले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे युग सुरू होणार याची कोणीच कल्पना केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत शोभा करंदलाजे, सुरेश अंगडी, प्रल्हाद जोशी, शिवकुमार उदाशी यापैकी एका खासदाराची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी अटकळ होती. अनंतकुमार हेगडे हे नाव चर्चेतही नव्हते. भाजप नेतृत्वाने आगामी निवडणुकीचा विचार करून अनंतकुमार हेगडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. कर्नाटकातील भाजप नेत्यांसाठी हा एक धक्का होता. आगामी निवडणुका येईपर्यंत आणि नंतरच्या काळातही असे धक्के स्थानिक नेतृत्वाला पचवावे लागणारच आहेत. याचाच अर्थ एकमेकांच्या कुरापती काढण्यातच धन्यता मानणाऱया विद्यमान नेतृत्वाला तुम्ही बदलला नाही तर आमच्याकडे पर्याय तयार आहे, हा संदेश देण्याचाच हा प्रयत्न होता. राष्ट्रीय नेतृत्वाच्या या धक्का तंत्रामुळे राज्य नेतृत्वाची अवस्था ‘अवघड जागीचे दुखणे’ अशीच झाली आहे. अमित शहा यांनी दिलेल्या धक्क्मयामुळे भाजपमध्ये बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत.

हुबळी येथील ईदगाद मैदानावर तिरंगा फडकविण्यासाठी जे आंदोलन झाले त्या आंदोलनातून ठळक प्रकाशात आलेल्या केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांचे नेतृत्व आणखी बळकट करण्यावर पक्षाने भर दिला आहे. कारण सध्याची त्यांची वाटचाल लक्षात घेता भविष्यात पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर येणार हे अधोरेखित झाले आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आला की, अनंतकुमार हेगडे नेहमी आघाडीवर असतात. गेल्या महिन्यात टिपू सुलतान जयंती झाली. सरकारी कार्यक्रमाला भाजप आणि हिंदू संघटनांनी विरोध केला तर काँग्रेस जयंती कार्यक्रम होणारच यावर ठाम होता. एखाद्या सरकारी कार्यक्रमात केवळ शिष्टाचार म्हणून का असेना आमदार, खासदार, केंद्रीय मंत्र्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत घालणे भाग असते. टिपू जयंतीच्या निमंत्रण पत्रिकेत शिष्टाचार म्हणूनही आपल्या नावाचा उल्लेख करू नका असे अनंतकुमार हेगडे यांनी अधिकाऱयांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या पाठोपाठ अनेक नेत्यांनी अशी सूचना केली होती. त्यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चाही झाली. अमित शहा यांना जसे अपेक्षित आहे तसे अनंतकुमार हेगडे यांचे नेतृत्व आहे. येडियुरप्पा यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दिवसापासून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा हेच आहेत. असे पक्षाचे राष्ट्रीय नेते सांगत आले असले तरी भविष्याचा चेहरा म्हणून अनंतकुमार हेगडे यांचे नेतृत्व पुढे येत आहे हेही तितकेच खरे!

Related posts: