|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीज वितरणचे सबस्टेशन महिना उलटूनही बंदच

वीज वितरणचे सबस्टेशन महिना उलटूनही बंदच 

घाईगडबडीत खासदारांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

लोकार्पण सोहळा होऊनही ग्रामस्थांच्या पदरी प्रतीक्षाच

वार्ताहर / आचरा:

आचरा येथील वीज वितरणच्या रखडलेल्या व अपूर्णावस्थेतील सबस्टेशनचा लोकार्पण  सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला होता. वादात सापडलेल्या या लोकार्पण सोहळय़ानंतर एक महिना उलटूनही आचरा सबस्टेशन सुरू झालेच नसल्याची माहिती समोर येत आहे. लोकार्पण सोहळय़ाप्रसंगी काही उर्वरित कामे पूर्ण करून 15 दिवसात पूर्णत्वाने सबस्टेशन सुरू होणार असल्याची माहिती देत वीज वितरणच्या अधिकाऱयांनी सारवासारव केली होती. परंतु एक महिना उलटूनही सबस्टेशन सुरू झालेले नाही. तर अपूर्ण असलेली कामेही त्याच स्थितीत अपूर्णावस्थेत असल्याचे समोर येत आहे.

सबस्टेशनचा उद्घाटन सोहळा अडकला होता वादात

आचरा सबस्टेशचा लोकार्पण सोहळा 6 नोव्हेंबरला खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला होता. यावेळी मूळ जमीनमालक व आचरा सरपंच यांना डावलल्याने हा लोकार्पण सोहळा वादात अडकला होता. यावेळी काम अपूर्ण असल्याबाबत वीज वितरणच्या अधिकाऱयांना छेडले असता 15 दिवसात सबस्टेशन पूर्णत्वाने सुरू करण्याची ग्वाही वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी दिली होती.

सबस्टेशनचे काम अजूनही अपूर्णावस्थेतच

  लोकार्पण सोहळा उरकला तरी सबस्टेशनची अपूर्ण असलेली कामे ठेकेदाराने पूर्ण  केलेली नाहीत. याबाबत आचरा उपअभियंता वीरेंद सिंग यांना विचारले असता ठेकेदाराने काम अजूनही अर्धवट ठेवल्याने सबस्टेशन पूर्णत्वाने सुरू झाले नसल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठांचे वारंवार लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. सबस्टेशनमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता अजूनही झालेली नाही, यात 33 इनकमर फिडरची आर्थिंगची व्यवस्था अर्धवट अवस्थेत आहे. नटबोल्ड गंजलेल्या स्थितीत आहे. त्यातून स्पार्पिंग होत असून ते बदलेले  नाहीत. स्टोअररुमचा बदलेला दरवाजाही सडलेल्या अवस्थेत आहे. यार्डगार्ड लाईनही नादुरुस्त अवस्थेत आहेत, अशी बरीच कामे अपूर्णावस्थेत असल्याच्या स्थितीत आहेत.

लोकार्पण होऊनही सबस्टेशनसाठी आचरा दशक्रोशीला प्रतीक्षेतच

 33 केव्हीचे आचरा सबस्टेशनमधून आचरासह 23 गावांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, खासदारांच्या हस्ते लोकार्पण सोहळा उरकूनही ठेकेदाराने अपूर्णावस्थेतील काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळेच टेक्निशियन्स, इनिस्पेक्टरकडून लाईन सुरू करण्याचा सर्व्हे झालेला नाही. सप्लाय सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच सबस्टेशनचे काम अपूर्णावस्थेत असल्याने सबस्टेशन चार्जिंग करण्याची परवानगीही प्राप्त झालेली नाही. यासगळय़ा प्रकारामुळे ठेकेदाराकडून सबस्टेशन वीज वितरणकडे हस्तांतरीत झालेच नसल्याचे समोर येत आहे. आचरा दशक्रोशातील ग्रामस्थांना आचरा सबस्टेशन सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Related posts: