पुस्तक, सीडी आणि साडी

तिची एकसष्टी चार दिवसांवर येऊन ठेपली होती. घरात ती आणि तो असे दोघेच राहतात. मुलं-सुना-नातवंडे परगावी आहेत. एकसष्टीच्या निमित्ताने आधल्या दिवशी येणारच आहेत. एका रात्री दोघांचा झालेला संवाद
“यंदा तुझ्या वाढदिवसाला काय घेऊ?’’
“कित्ती दिवसांपासून मी एक साडी पाहून ठेवली आहे.’’
“अगं पण तुला साडय़ा कितीतरी आहेत की. कपाट ओसंडून वाहतंय.’’
“पण ही शेड नाही ना माझ्याकडे.’’
“रागावणार नसशील तर एक बोलू? तुमचा बायकांचा हा नाद अतिरेकी वाटतो. उतारवयात देखील साडय़ांची भरमसाट खरेदी करीत राहता. परवा आमच्या साहेबांच्या आईची पंच्याहत्तरी होती. तिने मुलाकडून हट्टाने पैठणी घेतली. आता उरलेल्या आयुष्यात किती वेळा ती पैठणी त्या नेसणार आहेत?’’
“परवा तुम्ही देखील दोन महागडी पुस्तकं ऑनलाईन मागवली. तुमचं पुस्तकांचं कपाट गच्च भरलं आहे. शिवाय दुसऱया कपाटात जुन्या चित्रपटांच्या, गाण्यांच्या सीडीजचा ढीग साठलाय. ही सगळी हजारभर पुस्तकं उर्वरित आयुष्यात वाचणं आणि सगळय़ा सीडीज किमान एकदा तरी संपूर्ण ऐकणं शक्मय आहे का?’’
“पण माझ्या पश्चात ही पुस्तकं इतर कोणी वाचू शकतील. सीडीज कोणी ऐकू शकतील. साडीचं तसं नाही. देव न करो, पण दुर्दैवाने आज ना उद्या त्या आईंचं वयोमानानुसार बरंवाईट झालं तर ते साडय़ांचं कपाट रिकामं करून फेकून द्यावं लागेल. हल्ली मोलकरणी वगैरे देखील मेलेल्या स्त्रीच्या साडय़ा घ्यायला नकार देतात.’’
“ते काही मला सांगू नका. मला तुमच्याकडून ती साडी हवी म्हणजे हवी.’’
एकसष्टीच्या आधल्या रात्री पाहुणे आले. जेवणं झाली. गप्पाटप्पा सुरू झाल्या. रात्री बारापर्यंत सर्वजण जागे राहणार होते. बारा वाजता तिला शुभेच्छा दिल्या. मंडळी झोपायला गेली. झोपताना त्याने हळूच उशीखालून पिशवी काढली आणि तिला हवी असलेली साडी दिली. ती मोहरली. मिठीत शिरताशिरता तिने त्याला सांगितलं,
“एक नवी साडी आली की लगेच एक जुनी साडी मोलकरणीला भेट द्यायची असं मी आता ठरवलं आहे.’’
“पण तू शंभर वर्षे जगणार आहेस,’’ तो सद्गदित होत म्हणाला.
त्यांनी देवाला नमस्कार केला आणि दिवा मालवला.