|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गुजरात निवडणूक प्रतिष्ठेची

गुजरात निवडणूक प्रतिष्ठेची 

गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेस व भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून साम, दाम, दंड, भेद सर्व आयुधे वापरली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण गुजरात ढवळून काढला आहे. तर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा शिरावर घेण्यासाठी तयारीत असलेले राहुल गांधी भाजपा विरोधकांना सोबत घेऊन सरसावले आहेत. निवडणूक गुजरातची असली तरी ती आगामी लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात असल्याने अवघ्या देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे. मोदींची लाट ओसरली का या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या मतदानातून मिळणार असल्याने सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष गुजरातवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ओघानेच हा भाजपाच्या कसोटीचा आणि राहुल गांधी यांच्या नवीन रणनीतीचा कस पाहणारा क्षण आहे. 9 व 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होते आहे. 18 ला निकाल जाहीर होणार आहेत. ओघानेच नवे वर्ष कोणाचे याचा फैसलाच गुजरातची जनता करणार आहे. गुजरात हे भाजप व नरेंद्र मोदींसाठी मॉडेल आहे. या मॉडेलच्या आधारानेच मोदी-शहा यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली आणि ‘सब का साथ सब का विकास’ युवकांना नोकऱया, भ्रष्टाचारमुक्त भारत, परदेशी असणारा काळा पैसा भारतात परत आणणार वगैरे घोषणा केल्या. नोटाबंदी, रोकडविरहित व्यवहार आणि जीएसटीची अंमलबजावणी यांचे आता बरेवाईट परिणाम दिसू लागले आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात घोटाळ्याचे, गैरव्यवहाराचे मोठे कोणतेही प्रकरण पुढे आले नसले तरी शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. मध्यम वर्ग नाखूष आहे. व्यापारी संतप्त आहेत. मोदी व भाजपाला आपण घेतलेले निर्णय योग्य व देशहिताचे वाटतात व ते या निर्णयाला कोणतीही किंमत देऊन चिकटून राहणारच अशी भाषा करत आहेत तर, काँग्रेसने हा|िदक पटेल व अन्य मंडळींना एकत्र करून मोदींना होमपिचवरच जेरीस आणले आहे. मोदींच्या सभांना गर्दी नाही, भाजपाची लोकप्रियता घसरली आहे वगैरे येणाऱया बातम्या गुजरात निकालाकडे आणखीनच लक्ष वेधून घेत आहेत.1985 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये जातीय व धार्मिक समीकरणे जमवून काँग्रेसने 182 पैकी 149 जागा मिळवल्या होत्या. पण नंतर रामजन्मभूमी आंदोलन आणि हिंदुत्ववादी राजकारण यामुळे बाबरी मशिदीच्या पतनानंतर काँग्रेसची मोठय़ा प्रमाणात घसरण झाली व 1995 साली भाजपा गुजरातमध्ये सत्तेवर आली आणि मोदींचे नेतृत्व राष्ट्रव्यापी झाले आणि 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश मिळवत मोदी पंतप्रधान झाले. मोदी, शहांनी त्यानंतर काँग्रेसमुक्त भारत आणि शतप्रतिशत भाजपा असे अभियान आरंभले. भाजपाचे पारंप†िरक मित्रही बाजूला गेले पण भाजपाने निवडणूक यश हा फॉर्म्यूला आत्मसात केला. गुजरात निवडणुकीत दीडशे जागा जिंकणार असे आजही अमित शहा सांगतात. पण गुजरातमधून ज्या बातम्या येत आहेत किंवा मतदारांची चाचपणी करून जे अंदाज व्यक्त होत आहेत ते पाहता भाजपाला यश मिळवणे वाटते तितके सोपे नाही. सत्ता राखता आली तरी खूप झाले अशी स्थिती आहे. ताजे सर्वेक्षण आले आहे. त्यामध्ये भाजपा 111 जागा जिंकून सत्ता राखेल असे म्हटले आहे. पण, मतदार काय करेल हे स्पष्ट झालेले नाही. गोवा निवडणूक असो दिल्लीची असो अथवा उत्तर प्रदेशची निवडणूक असो मतदारांनी राजकीय पंडितांना आणि मतदार सर्वेक्षणांना नेहमीच धक्का दिला आहे. पण या सर्वेक्षणातून आणि विश्लेषणातून काही अंदाज बांधता येतात. रणनीती बदलता येते हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसने राहुल गांधीसोबतच डॉ. मनमोहन†िसंग आणि पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसच्या प्रचारात उतरवले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसची टक्केवारी रोज वाढते आहे आणि हा वेग मोठा आहे. मतदार मतपेटीपर्यंत पोहोचेल तेव्हा भाजपाला धक्का बसेल असे म्हटले आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे युवा नेते म्हणून पुढे आले आहेत. राहुल गांधींनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. राहुलनी उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव यांना सोबत घेतले होते. पण तेथे योगी आदित्यनाथ विजयी झाले व सर्व समीकरणे, अंदाज खोटे ठरवत भाजपाने उत्तर प्रदेश काबीज केला. गुजरातमध्ये भाजपाकडे कुणी योगी नाही त्यामुळे खुद्द पंतप्रधानांनाच योगी आदित्यनाथ व मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व प्रमुख नेते घेऊन मैदानात उतरायची वेळ आली आहे. निवडणुकीत राहुल गांधींचे सोमनाथ दर्शन, इंदिरा गांधींनी नाकाला रुमाल लावला, राहुल गांधींची पप्पू म्हणून संभावना असे मुद्दे भाजपाकडून तर, मोदींच्या विदेश यात्रा, गब्बर †िसंग टॅक्स, विकासाचे काय झाले असे मुद्दे काँग्रेसकडून पुढे आणले जात आहेत. यामध्ये मोठी वैचारिकता नाही. जीएसटीला सर्वपक्षीय मान्यता होती पण त्यांचे फायदे दिसायला वेळ लागणार आणि होणारा त्रास असह्य आहे म्हणून जनता अस्वस्थ आहे. जोडीला दीर्घकाळ गुजरातवर एकाच पक्षाचे राज्य आहे. त्यांचाही थोडाफार मतदारावर परिणाम होणार आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय व भाजपाचा पारंपरिक मतदार खुश दिसत नाही. याचा भाजपाला फटका बसणार पण तो कितपत बसतो व त्यांचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पहावे लागेल. भाजपाने एक बूथ वीस युथ वगैरे यंत्रणा व मोठी तयारी केली आहे. काँग्रेसने मध्यंतरी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत यश मिळवून तयारी केली आहे. सरकारच्या कामावर नाराज मंडळींना एकत्र करण्याचे काम काँग्रेसला साधले पण, ते अंतिम यश मिळवणार का हा प्रश्न आहे. पण गुजरातची लिटमस टेस्ट भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी नऊ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे राहुलकडे सोपवणार आहेत. काँग्रेस अडचणीत आहे. राहुल गांधी पक्षाला कशी दिशा-शक्ती देतात, हे जसे औत्सुक्याचे आहे तसा गुजरातचा निकाल अनेकार्थांनी लक्षवेधी ठरणार आहे.

 

Related posts: