|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीकरांचा कडकडीत बंद

कणकवलीकरांचा कडकडीत बंद 

चौपदरीकरण मूल्यांकनाला आक्षेप : प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा :

प्रवेशद्वाराला बांधल्या काळय़ा फिती

वार्ताहर / कणकवली:

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरण निवाडय़ात मालमत्ता व जमिनींचे केलेले मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला कणकवली बंदला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच दुकाने, स्टॉल बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकाळी 10 वाजता येथील काशिविश्वेश्वर मंदिरकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चात प्रकल्पग्रस्त, व्यापारी व शहरातील बंदला पाठिंबा दिलेल्या सर्वच संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय नेते सहभागी झाले होते. शिस्तबद्धरित्या निघालेला हा मोर्चा 10.45 च्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. मोर्चेकऱयांनी राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता करीत शासन, प्रशासनाविरोधात हाताला बांधलेल्या काळ्य़ा फिती प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधून पुन्हा निषेध व्यक्त केला.

भाजी विक्रेत्या महिलांचाही लक्षणीय सहभाग

सकाळी 9 पासूनच येथील काशिविश्वेश्वर मंदिरकडे कणकवलीकर एकत्र होत होते. काशिविश्वेश्वर मंदरकडून निघालेला मोर्चा पटकीदेवी, बाजारपेठमार्गे पटवर्धन चौकातून महामार्गावरून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. मोर्चाच्या सुरुवातीलाच कणकवलीतील भाजीविक्रेत्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. राजकीय पदाधिकारी, विस्थापित व्यापारी व नागरिक, संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात त्या पाठोपाठ सहभागी झाले होते. बाजारपेठेतून जसजसा मोर्चा पुढे सरकत होता, तसतसे मोर्चात नागरिक सहभागी होत होते. पटवर्धन चौकात या मोर्चाला भव्य स्वरुप आले. मोर्चेकऱयांनी हाताला काळ्य़ाफिती बांधत शासन, प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मोर्चात निषेधाचे बॅनर व फलक घेऊन शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर तेथे राष्ट्रगीत म्हणून मोर्चाची सांगता झाल्याचे महामार्ग चौपदरीकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी जाहीर केले.

निषेध नोंदविण्यासाठी काळय़ा फिती

काही मोर्चेकऱयांनी आमचा शासन, प्रशासनाविरोधातला निषेध नोंदविण्यासाठी आम्ही बांधलेल्या काळ्य़ाफिती प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बांधत असल्याचे जाहीर केले. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी मोर्चेकऱयांना तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या आहेत. आता पुढे काही करू नका, असे सांगितले. मात्र, मोर्चेकऱयांनी आपल्या मागणीवर ठाम राहत अखेर काळ्य़ाफिती प्रवेशद्वारावर बांधण्यास सुरुवात केली. मोर्चात शासन व प्रशासनाच्या सहभागाचे निषेध नोंदविणारे फलकही प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बांधले. यावेळी शासनाने या मूक मोर्चाची दखल न घेतल्यास, भविष्यात उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त व मोर्चेकऱयांनी दिला.

आजचा मूक मोर्चा केवळ इशारा!

प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचल्यावर अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी या मूक मोर्चात सहभागी झालेल्या व पाठिंबा दिलेल्या कणकवलीतील सर्व संघटना, व्यापारी संघटना, राजकीय पक्ष व कणकवलीकरांचे आभार मानले. प्रशासनाने केलेल्या चुकीच्या मोबदल्यामुळे शहरातील विस्थापित उघडय़ावर येणार आहेत. त्यामुळे शासनाला आजचा हा केवळ इशारा आहे. आंदोलनाची पुढील दिशा बैठक घेऊन निश्चित करण्यात येईल, असे वरवडेकर यांनी सांगितले.

चोख पोलीस बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शासनाच्या निषेधार्थ बॅनर लावण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कणकवली पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सूर्याजी नाईक यांच्यासह 10 अधिकारी व दंगल नियंत्रक पथकाच्या एका तुकडीसह 40 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. सायंकाळपर्यंत शहरात पोलीस बंदोबस्त कार्यरत होता.

मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाकडे आला, त्यावेळी तेथे माजी आमदार राजन तेलीही उपस्थित होते. मोर्चात सहभागी नसलो, तरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो, असे तेली यांनी सांगितले. मोर्चात संदेश पारकर, अबिद नाईक, कन्हैया पारकर, समीर नलावडे, सुशांत नाईक, बंडू हर्णे, रुपेश नार्वेकर, अनिल शेटय़े, शिशीर परुळेकर, अनिल हळदिवे, राजू राठोड, माधव शिरसाट, विजय पारकर, संजय मालंडकर, नितीन पटेल, विलास कोरगावकर, बाळा बांदेकर, महेश नार्वेकर, सुजित जाधव, सचिन म्हाडगूत, जयेश धुमाळे, सचिन सावंत, सत्यवान मांजरेकर, रत्नाकर देसाई, प्रा. दिवाकर मुरकर, बाबू आचरेकर, भूषण परुळेकर, अनघा देवरुखकर, पांडुरंग वर्दम, विठ्ठल देसाई, सुनील कोरगावकर, सुनील परब, सुहास परब, प्रमोद मसुरकर, संतोष पुजारे, जय शेटय़े, बबली राणे, दीपक अरवारी, सुशील पारकर, प्रसाद कोरगावकर, डॉ. संदीप नाटेकर, सुभाष गोवेकर, सुहास हर्णे, महेश लाड, सुनील काणेकर आदी सहभागी झाले होते.

प्रकल्पग्रस्तांच्यावतीने गाऱहाणे!

काळ्य़ाफिती प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटला बांधल्यानंतर मोर्चेकऱयांनी शासनाला जाग यावी व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून देवाला गाऱहाणे घातले. ‘बा देवा महाराजा, कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांवर ईलेला हय़ा विघ्न दूर करून प्रकल्पग्रस्तांचे मागणे पूर्ण कर, कणकवलीकर प्रकल्पग्रस्तांचा समाधान होयत असा कर, आम्ही ही केलेली मन्नत मार्गी लागली, तर या प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटवर पाच नारळाचा तोरण बांधू व तुका ‘सोन्याची टोपी’ घालू’, असे गाऱहाणे कणकवलीकरांच्यावतीने संजय मालंडकर यांनी घातले. त्याला मोर्चेकऱयांनी ‘होय महाराजा’ म्हणून साथ दिली.

Related posts: