|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच धरणाच्या कामासाठी शासन प्रयत्नशील

धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच धरणाच्या कामासाठी शासन प्रयत्नशील 

प्रतिनिधी /आजरा :

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उचंगी धरण व धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच धरणाचे काम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे यांनी केले. येथील प्रशासकीय भवनात झालेल्या उचंगीतील धरणग्रस्त व लाभ क्षेत्रातील शेतकऱयांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, नंदा बाभूळकर, तहसीलदार अनिता देशमुख, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी खिलारे यांनी उचंगीतील कामाचा आढावा घेतला. उचंगीतील 58 शेतकऱयांना जमीन देय असून शासनाकडे 72 हेक्टर जमीन शिल्लक आहे. तर चित्रीच्या धरणाच्या खालील बाजूस शासनाच्या नावे असलेली जमीन उचंगी धरणग्रस्तांना देण्याबाबत शासनाने मान्यता दिली असून उचंगीतील धरणग्रस्तांना देय असलेली जमीन देऊन पुनर्वसनाच्या तसेच धरणाच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी धरणग्रस्तांच्यावतीने जेऊरचे सरपंच मारूती चव्हाण, कॉ. संजय तर्डेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. उचंगीतील निर्वाह क्षेत्राबाहेरील 39 शेतकऱयांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिवाय पुनर्वसन कायद्यानुसार जमीनीसाठी अर्ज करूनही 11 धरणग्रस्त शेतकऱयांचे पैसे शासनाने त्यावेळी भरून घेतले नाहीत. ते पैसे भरून घ्यावेत. निर्वाह क्षेत्राबाहेरील शेतकऱयांना पात्र ठरवून जमीन द्यावी. तसेच चाफवडे येथील 150 घरांच्या संपादनाचा प्रश्न सोडवावा या प्रमुख प्रश्नांसह अन्य प्रश्नांची निर्गत झाल्याखेरीज धरणाचे काम सुरू करू नये अशी सूचना यावेळी धरणग्रस्त शेतकऱयांनी केली.

Related posts: