|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गिजवणेत विवाहितेचा आगीत होरपळून मृत्यू

गिजवणेत विवाहितेचा आगीत होरपळून मृत्यू 

प्रतिनिधी /गडहिंग्लज :

गिजवणे येथील पुष्पा पांडूरंग जाधव (रा. सुतार गल्ली, वय 40) यांचा रहात्या घरी गुरूवारी सकाळी 11 च्या दरम्यान भाजून मृत्यू झाला. यात संसारोपयोगी वस्तूही जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. पोलीस पाटील महादेव कुंभार यांनी या घटनेची वर्दी गडहिंग्लज पोलीसात दिली आहे.

  मयत पुष्पाचे पती पांडूरंग जाधव हे नेहमी प्रमाणे कामासाठी बाहेर गेले होते.   त्यांचा मुलगा तुषार व मुलगी प्रार्थना ही दोन्ही मुले शाळेला गेली होती. पुष्पा जाधव या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना घराला अचानक भिषण आग लागली. यातच त्या भाजून जागीच मयत झाल्या. आगीचा लोट घराच्या छपरातून बाहेर आल्यानंतर शेजाऱयांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर आजूबाजूला मोठी धावपळ उडाली. गडहिंग्लज पालिकेच्या अग्नीशमन दलाला बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. काही वेळानंतर आग आटोक्यात आली. शेजाऱयांनी कामावर गेलेल्या पती पांडूरंग जाधव यांना फोन करून घराला आग लागल्याचे सांगितले. त्यांनी लगेच घर गाठले होते. पण मोठय़ा आगीत पत्नी पुष्पाला वाचवण्यात त्यांना अपयश आले. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. या आगीत घरातील भांडी, शोभेचे साहित्य, कपडे, लाकडी कपाटे, गादी, तिजोरी आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गडहिंग्लज पोलीसांना घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. वर्दीत मयत पुष्पा ही स्वयंपाक करत असताना भाजून अथवा स्वतःला पेटवून घेऊन जखमी होऊन मयत झाली असावी असे म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आर. डी. नांगरे करत आहेत. या घटनेने गिजवणे गावात शोककळा पसरली असून दिवसभर याठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होती.

Related posts: