|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लेंबकळणाऱया तारांना घराचा आधार

लेंबकळणाऱया तारांना घराचा आधार 

अकोळ :

 येथील वड्डर गल्लीतील अशोक वड्डर यांच्या घरावरून जोडलेल्या विद्युत खांबाच्या लोंबकळणाऱया तारा चक्क घराच्या छपराला टेकल्या आहेत. गेल्या चार-पाच महिन्यापासून आपण येथील हेस्कॉमच्या स्थानिक कर्मचाऱयांच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप कोणीच दखल घ्यायला तयार नाहीत, असे वड्डर यांनी सांगितले.

मुख्य प्रवाहाच्या ताराच घरावर टेकल्याने त्याचा धोका कधी होईल याचा अंदाज नसल्याने आपला परिवार भयभीत अवस्थेत आहे. सध्या लोंबकळणाऱया विद्युत तारांमुळे अनेक ठिकाणी उसाच्या फडांना आग लागून लाखो रुपयांची हानी झाली आहे. तर शेतातून गेलेल्या तुटून पडलेल्या तारांच्या स्पर्शाने जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. हे सर्व माहित असतानाही किरकोळ कामाकडे होणारे दुर्लक्ष निश्चितच बेफिकीरीचे लक्षण म्हणावयास हरकत नाही.

 रोज मोलमजुरी करून चरितार्थ चालविणाऱया परिवाराप्रमाणेच त्यांच्या आजूबाजूच्या घरांनाही यामुळे धोका पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा संबंधित हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाहित तारांची जोडणी तातडीने करून वसाहतीमधील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील समस्यांकडे डोळेझाक

या भागतील अनेकांच्या शेतातून धोकादायक अंतरावरुन विद्युत तारा गेल्या आहेत. या धोकादायक स्थितीविषयी हेस्कॉम अधिकाऱयांना वेळोवेळी कळविण्यात आले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नुकतीच बेडकिहाळ येथे विद्युत तारांच्या स्पर्शाने वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागातील धोकादायक तारांची पाहणी करुन उपाययोजना राबविण्याची गरज असताना त्याकडे डोळेझाक केले जात आहे. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related posts: