|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘आधार’ जोडणीसाठी मुदतवाढ मिळणार

‘आधार’ जोडणीसाठी मुदतवाढ मिळणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आधार कार्डांना विविध सरकारी योजनांशी जोडण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती केंद्र सरकारच्यावतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. यासंबंधीची अधिसूचना शुक्रवारी अधिसूचना जारी केली जाणार आहे. विविध सरकारी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान तसेच सेवांना ‘आधार’शी जोडण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवल्याने सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. मात्र, मोबाईल क्रमांक आणि आधार जोडणीची अंतिम मुदत 6 फेब्रुवारीच असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्या केंद्र सरकारच्या 131 कल्याणकारी योजनांना आधारशी जोडण्यात आले आहे. सरकारी शिष्यवृत्त्या, अनुदानित एलपीजी सिलिंडर, कृषी कर्ज, निवृत्ती वेतन यासारख्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ सक्ती करण्यात आली आहे. आधार सक्तीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाळ यांनी सांगितले की, आधार कार्डला स्थगिती देता येणार नाही. आम्ही याबाबत आमची बाजू मांडायला तयार आहोत, असे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर याचिकाकर्त्यांच्या वतीने आधार कार्डमुळे गोपनीयतेचा भंग होत असून आधार सक्तीला स्थगितीबाबत तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी या याचिकांवर पुढील आठवडय़ात सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Related posts: