|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » अर्जेन्टिना, जर्मनी उपांत्य फेरीत

अर्जेन्टिना, जर्मनी उपांत्य फेरीत 

भुवनेश्वर :

अर्जेन्टिनाने इंग्लंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत 3-2 असा निसटता विजय मिळवित हॉकी वर्ल्ड लीग फायनलच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत अर्जेन्टिनाशी यजमान भारताशी शुक्रवारी लढत होणार आहे. अन्य एका सामन्यात जर्मनीने हॉलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

लुकास व्हिला (21 वे मिनिट), मतायस पार्डेस (29) व जुआन गिलार्डी (34) यांनी अर्जेन्टिनाचे तर डेव्हिड काँडन (29) व ऍडम डिक्सन (60) यांनी इंग्लंडचे गोल नोंदवले. या सामन्यात इंग्लंडचेच वर्चस्व होते आणि त्यांनीच अर्जेन्टिनाच्या सर्कलमध्ये जास्तीत जास्त वेळा घुसखोरी केली. पण अर्जेन्टिनाने भक्कम बचावाचे प्रदर्शन करीत इंग्लंडला लवकर यश मिळू दिले नाही. जेव्हा अर्जेन्टिनाने आक्रमण केले तेव्हा इंग्लंडनेही भक्कम बचावाचे दर्शन घडविले. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला.

दुसऱया सत्रात मात्र अर्जेन्टिनाने पहिले यश मिळविले. लुकास व्हिलाने फ्रीहिटला डिफ्लेक्ट करीत हा गोल नोंदवला. जुआन लोपेझने फ्रीहिट घेतली आणि ऍडम डिक्सनने डावा उंच उचलत चेंडूला पुढे जाऊ दिले. त्या ठिकाणी असणाऱया व्हिलाने या संधीचा लाभ चेंडू अचूक जाळय़ात धाडला. इंग्लंडने लगेचच प्रत्युत्तर दिले. सॅम वार्डने डावीकडून क्रॉस पुरविला. पण इंग्लंडच्या आघाडीवीरांना अर्जेन्टिनाची बचावफळी भेदता आली नाही. 29 व्या मिनिटाला पार्डेसने त्यात आणखी एका गोलाची भर घालत अर्जेन्टिनाची आघाडी 2-0 अशी केली. पण याच मिनिटाला इंग्लंडच्या मिडलटनने डेव्हिड कॉन्डनला पास पुरविला, त्याने त्यावर गोल नोंदवून अर्जेन्टिनाची आघाडी 2-1 अशी कमी केली.

उत्तरार्धातील चौथ्या मिनिटाला अर्जेन्टिनाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्यावर गिलार्डीने गोल नोंदवला. अखेरच्या सत्रात इंग्लंडने जोरदार आक्रमणे केली. शेवटची काही मिनिटे ते गोलरक्षकाशिवाय खेळत होते. त्यांनी पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यापैकी एकावरही त्यांना गोल नोंदवता आला नाही. सामना संपण्यास 16 सेकंद असताना डिक्सनचा क्रॉस लुकास रॉसीने चेंडू डिफ्लेक्ट करीत आपल्याच गोलजाळय़ात मारल्याने इंग्लंडला दुसरा गोल मिळाला आणि लगेचच सामना संपल्याची शिटी वाजली.

अन्य एका सामन्यात जर्मनीने हॉलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. जर्मनी-हॉलंड यांच्यात निर्धारित वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला होता. ऑस्टेलियाशी त्यांची उपांत्य लढत होणार आहे.

Related posts: