|Saturday, October 20, 2018
You are here: Home » क्रिडा » कसोटी मानांकन यादीत विराट दुसरा

कसोटी मानांकन यादीत विराट दुसरा 

वृत्तसंस्था /दुबई :

श्रीलंकेविरुद्ध तिसऱया कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 243 धावांची खेळी साकारणारा विराट कोहली ताज्या आयसीसी कसोटी मानांकन यादीत दुसऱया स्थानी झेपावला. विराटने त्या लढतीत द्विशतकानंतर दुसऱया डावात शानदार अर्धशतक झळकावले होते. मालिकेत त्याने 610 धावांचे योगदान दिले. 3 सामन्यांच्या या मालिकेत नागपूरमधील कसोटी भारताने जिंकली तर कोलकाता व नवी दिल्ली येथील लढती अनिर्णीत राहिल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये सलग 3 सामन्यात लागोपाठ तीन शतके झळकावणारा विराट लंकेविरुद्ध मालिकेपूर्वी कसोटी फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी होता. पण, येथे 152.50 च्या सरासरीने धावांची आतषबाजी करत त्याने या मानांकनात राष्ट्रीय सहकारी चेतेश्वर पुजारासह केन विल्यम्सन व जो रुट यांनाही मागे टाकले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ व दुसऱया स्थानावरील विराट यांच्यात आता केवळ 45 गुणांचा फरक असून आता विराटचे लक्ष्य अर्थातच अव्वलस्थानावर असणार आहे. वनडे व टी-20 मालिकेत विराट यापूर्वीच अव्वलस्थानी विराजमान राहिला आहे. स्मिथ मागील आठवडय़ात 941 गुणांसह कसोटीत फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक गुण जमवणारा संयुक्त पाचवा फलंदाज ठरला. आता त्याच्या खात्यावर 938 गुण आहेत तर विराटच्या खात्यावर सध्याच्या घडीला 893 गुण आहेत.

2005-2006 सालात डिसेंबर-जानेवारीत माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार रिकी पाँटिंग एकाच वेळी तिन्ही क्रिकेट प्रकारात अव्वलस्थानी विराजमान होण्यात यशस्वी ठरला तर त्यापूर्वी त्याचाच माजी संघसहकारी मॅथ्यू हेडनने देखील असाच पराक्रम गाजवला होता. त्या यादीत आता विराट कोहलीला स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. सध्याच्या घडीला स्मिथकडे विराटपेक्षा बऱयाच गुणांची आघाडी आहे. अन्य भारतीय फलंदाजात सलामीवीर मुरली विजयचे स्थान 3 अंकांनी सुधारले असून तो 25 व्या स्थानी पोहोचला. मध्यफळीतील फलंदाज रोहित शर्माही 6 अंकांनी सुधारत 40 व्या स्थानी आला. पुजाराचे स्थान दोन अंकांनी वधारले असून तो चौथ्या स्थानी पोहोचला. दरम्यान, गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱया स्थानी घसरला तर अश्विन चौथ्या स्थानी कायम राहिला आहे.

Related posts: