|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजकीय वरदहस्तामुळेच कांदोळीत गांजा लागवड

राजकीय वरदहस्तामुळेच कांदोळीत गांजा लागवड 

गिरीश मांद्रेकर /म्हापसा :

कांदोळी येथे गांजा लागवडीच्या बागायतीमध्ये कळंगूट पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा घालून दोघांना अटक केली असली तरी या जागेचे मालक मोकाट फिरत आहे. प्रत्यक्षात त्यांच्याच आशीर्वादाने आराडी कांदोळी येथे गांजा लागवडीचा व्यवसास सुरु आहे. राजकीय वरदहस्त असलेले लॅनी फिएलो हा कांदोळीच्या माजी सरपंच सेण्ड्रा फिएलो यांचे दिर असून सरपंच ब्लेझ फर्नांडिस यांचे बिझनेस पाटर्नर आहेत. कळंगूट मतदारसंघातील गांजाच्या लागवडीच्या बागेतच पोलिसांनी छापा टाकल्याने याबाबत सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरु आहे.

कळंगूटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी किनारी भागातील वेश्या व्यवसाय तसेच अमलीपदार्थाचे राज्यातून उच्चाटन व्हावे यासाठी अहोरात्र झटत असलो तरी त्यांच्याच मतदारसंघात आणि खास करुन कांदोळी येथे त्यांच्याच मर्जीतील निकटवर्तीय गांजा पिकविण्याचा धंदा गेल्या दोन वर्षापासून करीत आहेत ही गांभीर्याची गोष्ट आहे.

लॅनी फिएलो आराडी कांदोळी येथे डोंगराळ भागात असलेल्या एका प्लॉटमध्ये गेल्या दोन वर्षांपासून गांजा लागवडीचा व्यवसाय करीत आहे. त्याच्या देखभालीसाठी शांता शाहू व परवेश सलाम यांना ठेवण्यात आले होते. येथे छापा टाकल्यानंतर दोघाही संशयित आरोपीनी ही जागा लॅनी फिएलो याच्या मालकीची असल्याचे सांगितले. जागेच्या मालकीची कागदपत्रेही पोलिसांनी पडताळणी केली असता सदर जागा लॅनी फिऐलो यांच्या मालकीची असल्याचे समजले. डोंगराळ भागात मंदिराच्या बाजूलाच 450 चौमीटर जागेत येथे सात-आठ रुम भाडय़ाने देण्यात आले आहे. पैकी एका रुममध्ये गांजाच्या झाडांची पाने काढून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी येथे असलेली सर्व गांजाची झाडे काढून ताब्यात घेतली. विशेष म्हणजे ग्रीनकलरची पोती व प्लायवूड घालून ही सर्व झाडे बंद करुन ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे राहाणाऱया कुणालाही याचा थांगपत्ता नव्हता. या झाडय़ांच्या पानांची बाहेर सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिकांना याबाबत संशय आला होता. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर यावर कारवाई करण्यात आली. या गांजाच्या पानांना जाऊ प्रकाश मिळू नये म्हणून त्याची झाडे बंद करुन ठेवण्यात आली होती.

Related posts: