|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूंचा सहकार्याचा प्रस्ताव आपने नाकारला

लालूंचा सहकार्याचा प्रस्ताव आपने नाकारला 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या लालू यादवांच्या प्रयत्नांना आपने सुरूंग लावला आहे. आपशी सहकार्य करण्याचा प्रस्ताव लालू यादव यांनी मांडला होता. आप, काँगेससह इतर पक्षांनी एकत्र येऊन भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांविरोधात महाआघाडी तयार करावी, असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.

नुकत्याच एका टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी आपशी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली होती. तसेच काँगेस आणि आप या दोन पक्षांमधील मतभेद दूर करण्यासाठी मध्यस्थी करण्यास राजी असल्याचेही म्हटले होते. दोन महिन्यांपूर्वी यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच हे दोन पक्ष जवळ येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

तथापि, आपने या शक्यतांना नाकारले आहे. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर कोणतीही हातमिळवणी करण्यास नकार दिला. त्यांनी तसे स्पष्ट वक्तव्य गुरूवारी केले. आपचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनीही यादवांबरोबर एकत्र येण्याची शक्यता फेटाळली. राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र आतापर्यंत त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी बनविण्याची लालू प्रसाद यादव यांची योजना आहे.

Related posts: