|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एनसीसीच्या दोन अधिकाऱयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा

एनसीसीच्या दोन अधिकाऱयांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा 

खर्चाच्या खोटय़ा पावत्या केल्याचा ठपका

5 लाखांच्या अपहाराचा आरोप

लोकायुक्तांच्या चौकशीत दोषी

प्रतिनिधी /रत्नागिरी

खर्चाची खोटी बिले तयार करून सुमारे 5 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी एनसीसी नेवलचे तत्कालीन कमांडींग ऑफिसर व स्टोअर असिस्टंट यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अनेक एनसीसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काही समाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर लोकायुक्तांनी याप्रकरणी लाचलुचपत विभागाला चौकशीचे आदेश दिले होत़े

तात्कालीन एनसीसी नेवल कमांडिंग ऑफिसर विद्धेश उंदिरे (सध्या अंदमान निकोबार येथे कमांडीग ऑफिसर) व स्टोअर असिस्टंट आशिष कुमार (सध्या चेन्नई येथे नेव्ही ऑफिसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱयांची नावे आहेत़ जुलै 2015 ते फेब्रुवारी 2016 या दरम्यान रत्नागिरी येथे कार्यरत असताना 5 लाखाचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होत़ा

या अधिकाऱयांनी आपल्या कार्यकाळात एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक कॅम्प आयोजित केले होत़े यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा देखील समावेश होत़ा यामध्ये या दोघांनी संगनमत करून बोटींची, टॅव्हल एजन्सीची व इतर खर्चाची सुमारे 5 लाखाची खोटी बिले तयार करून अपहार केला होत़ा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवला होत़ा तसेच माहितीच्या अधिकारात सुद्धा या दोघा अधिकाऱयांनी खोटी बिले तयार केल्याचे उघड झाले होत़े

याप्रकरणाची गंभीर दखल घेत लोकायुक्तांनी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव यांना या अपहार प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होत़े शुक्रवारी याबाबत गुरव यांनी शहर पोलीस ठाण्यात या अधिकाऱयांना दोषी मानून त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 व भादवि कलम 467, 468,409, 109 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.