|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वैद्यनाथच्या तिघांचा मृत्यू

वैद्यनाथच्या तिघांचा मृत्यू 

प्रतिनिधी / लातूर

शुक्रवारी दुपारी परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखाना येथे रसाची उकळती टाकी फुटल्याने सुमारे 11 कर्मचारी भाजले होते. त्यातील अनेकांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले. शनिवारी सकाळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. या दुर्घटनेत लातूर येथे उपचारासाठी आलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दुपारी वैद्यनाथ साखर कारखाना येथे ही भीषण दुर्घटना घडली. परळी, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारानंतर 11 जणांना लातूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. यात धनाजी देशमुख अभियंता, लहू डाके, सुनील भंडारे, सुमित भंडारे, हनुमंत संगापुरे, अभिमान डाके आदिंचा समावेश आहे.

लातूर येथे उपचारासाठी आलेल्या कर्मचाऱयांपैकी गौतम तुकाराम घुमरे (वय 50) रा. पिंपळगाव ता. परळी, मधुकर पंढरीनाथ आदनाक रा. धानोरा ता. अंबाजोगाई व सुभाष गोपीनाथ कराड रा. निंबोरा ता. परळी या तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य कर्मचारी गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी तातडीने लातूर येथे येऊन जखमींची विचारपूस केली. मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱयांच्या नातेवाईकांना नोकरी व जखमीना उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी मुंडे यांनी केली.

यातील जखमी रुग्णांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रितम मुंडे यांनी भेट दिली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची चौकशी केली. मृत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना शासनाकडून दोन लाख रुपयाची तर जखमींना पंन्नास हजाराची आर्थीक मदत देण्यात येणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच कारखान्याकडूनही आर्थीक मदत देण्यात येणार आहे. त्यातील अनेकांना कारखान्यात नोकरी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.