|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रकल्पाचे समर्थन करून जठारांनी दलाली स्पष्ट केली!

प्रकल्पाचे समर्थन करून जठारांनी दलाली स्पष्ट केली! 

ग्लोबल वार्मिंग अभ्यासक राजेंद्र फातर्पेकरांचा आरोप

जनतेचा विरोध झुगारून केलेले समर्थन निषेधार्ह!

प्रतिनिधी / विजयदुर्ग:

राजापूर-नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा प्रखर विरोध असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रमोद जठार हे समर्थन करीत आहेत. विकासाच्या व रोजगार निर्मितीच्या नावाखाली हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात आहे. सत्तेतील भाजप-शिवसेना युती सरकारला विरोध दर्शविण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी मुंबई गाठून आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. तरीही प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पविरोधी भावना समजून न घेता जठार यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या प्रकल्पाचे समर्थन करून त्यांनी स्वतः प्रकल्पातील दलाल असल्याचे स्पष्ट केले आहे, असा आरोप ग्लोबल वार्मिंगचे अभ्यासक राजेंद्र फातर्पेकर यांनी येथे केला.

रामेश्वर-कोलवाडी येथील रिफायनरी प्रकल्पग्रस्त सचिन पुजारे यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीचे योगेश नाटेकर, विक्रांत नाईक, प्रकल्पविरोधी समितीच्या महिलाध्यक्षा स्वाती मसुरकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. श्री. फातर्पेकर म्हणाले, रिफायनरी प्रकल्प विनाशकारी व प्रदूषणकारी असताना हा प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी का मारला जात आहे? विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प कोकणात शासनामार्फत आणले गेले, त्या प्रकल्पातून किती विकास झाला व किती रोजगार निर्मिती झाली, याची माहिती जठार यांनी जनतेला द्यावी. विकासाच्या नावाखाली कवडीमोल दराने जमिनी हडप करून त्या कोणाच्या घशात घातल्या जात आहेत, हेदेखील त्यांनी स्पष्ट करावे. सत्तेत राहून रिफायनरी प्रकल्पाविरोधातील जनतेच्या भावना समजून घ्यायच्या नसतील तर जठार यांनी बेताल व दिशाभूल करणारी वक्तव्ये तरी करू नयेत. या प्रकल्पासाठी जनतेला फसवून ज्या दलालांनी खासगी गुंतवणूकदार व सरकारला जमिनी मिळवून दिल्या, ते दलाल प्रकल्पासोबतच कोकणातून हद्दपार होतील. वृत्तपत्रांतून जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करून जठारांनी ते स्वतः प्रकल्पातील दलाल असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रकल्पाविरोधी एकजूट असणारी जनता जठारांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

तर त्यांनी पुरावे देऊन बोलावे!

प्रकल्पविरोधी समितीच्या महिलाध्यक्षा मसुरकर म्हणाल्या, जनतेचा विरोधाकडे पाठ फिरवून जठारांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. कोकणात यापूर्वी अशा विनाशकारी प्रकल्पातून किती विकास आणि रोजगार निर्मिती झाली, हे त्यांनी पुराव्यानिशी सांगावे. येथील जनता सुज्ञ असून ती कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रकल्पविरोधी लढा यशस्वी करून दाखवेल, असे त्यांनी सांगितले. तसेच राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करूनच आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे. या लढय़ात महिलांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नाटेकर यांनीही माजी आमदार जठार यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.