|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धामणे घाटातील आगीत 35 एकर गायरान आगीच्या भक्ष्यस्थानी

धामणे घाटातील आगीत 35 एकर गायरान आगीच्या भक्ष्यस्थानी 

वार्ताहर/ उत्तूर

उत्तूर-धामणे दरम्यान असलेल्या धामणे घाटात शनिवारी सकाळी आग लागली. तब्बल 35 एकर गायरान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जनवारांसाठी लागणारा सुका चारा कापण्यासाठी या गायरानचा वापर होतो. या आगीत अंदाजे तीन लाख गवत जळून खाक झाले तर शेकडो झाडे होरपळून गेली असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गायरानमधून मोठय़ा प्रमाणात दुराचे लोळ उठल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी गायरानाच्या दिशेने धाव घेतली. शिवाय शनिवारच्या आठवडा बाजारासाठी धामणेकडून उत्तूरकडे जाणाऱया ग्रामस्थांना गायरानात आग लागल्याचे लक्षात आले. आगीची माहिती मिळताच उत्तूर येथील ग्रामस्थांनीही गायरानच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुके गवत असल्याने आग भडकतच होती. वाऱयाबरोबर आग वेगाने पसरत होती. काही शेतकऱयांनी गवत कापून रचून ठेवलेल्या गवत गंजीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

गायरामधून आगीचे आणि धुराचे उठणारे लोळ पाहून आग विझविण्यासाठी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र झपाटय़ाने आग पसरत असल्याने आग आटोक्यात आणताना ग्रामस्थांची दमछाक झाली. दरम्यान ग्रामस्थांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. उत्तूर ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकरही याठिकाणी दाखल झाला. पाण्याचा मारा सुरू करण्याबरोबरच झाडांच्या फांद्या तोडून ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र तोवर मोठय़ा प्रमाणात गवत जळून खाक झाले होते.

गायरानात मोठय़ा प्रमाणात गवत असते. शेतकरी जनवारांना उन्हाळय़ात लागणारे गवत येथून कापतात. यावर्षी काही शेतकऱयांनी गवत कापले होते तर बहुतांशी शेतकऱयांचे गवत कापायचे काम बाकी होते. या आगीत सर्वच गवत जळून खाक झाल्याने अनेक शेतकऱयांसमोर जनावरांच्या सुक्या चाऱयाचा प्रश्न उभा राहणार आहे.

 

Related posts: