|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » जत पालिकेसाठी चुरशीने 75 टक्के मतदान

जत पालिकेसाठी चुरशीने 75 टक्के मतदान 

प्रतिनिधी/ जत

जिल्हय़ाचे लक्ष वेधून राहिलेल्या जत नगरपालिकेच्या दुसऱया निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने 75.55 टक्के मतदान झाले. भाजपा, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या चार नगराध्यक्षपदांच्या उमेदवारासह 76 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. रविवारी जवळपास सर्वच प्रभागात किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले आहे. तर यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी अटीतटीची तिरंगी लढत झाल्याने मतदानाची टक्केवारीही जळपास आठ टक्क्यांनी वाढली आहे. आज सोमवारी सकाळी दहा वाजता येथील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. दीड तासात निकाल हाती येणार आहे. या निवडणुकीत 24 हजार 561 मतदारांपैकी 18556 मतदारांनी हक्क बजावला. यात महिला मतदार 8  हजार 835 तर पुरूष मतदार 9 हजार 721 आहेत.

गेल्या महिनाभरापासून जत पालिकेच्या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संपूर्ण सांगली जिल्हय़ाचे लक्ष वेधून राहिलेल्या आणि विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहण्यात येत आहे. त्यामुळे अतिशय अटीतटीचा येथे सामना रंगला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस यांच्यात चुरस लागली होती. शिवाय यंदा प्रथमच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागल्याने रंगत वाढली. नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून डॉ. रेणुका आरळी, राष्ट्रवादीकडून सौ. शबाना इनामदार, काँग्रेसकडून सौ. शुभांगी बन्नेनवार, शिवसेनेकडून शांताबाई राठोड या उमेदवार रिंगणात होत्या. तर दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदासाठी तब्बल 76 उमेदवारांनी भवितव्य आमजावण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. शहरातील दहा प्रभागासाठी 33 मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. रविवार असल्याने अनेक प्रभागात दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास पन्नास टक्के मतदान पूर्ण झाले होते. सकाळी साडेनऊ वाजता 11.72 टक्के, दीड वाजता 48.80 टक्के, साडेतीन वाजता 63.34 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत 75.55 टक्क्यावर आकडा गेला होता.

पालिकेसाठी तिरंगी लढत असल्याने येथील तिनही प्रमुख पक्षांनी मतदान आणण्यासाठी जोरकस प्रयत्न केल्याचे चित्र होते. वाडीवस्ती, उपनगरातील मतदारांना आणण्यासाठी वाहनांचीही सोय अनेकांनी केली होती. त्यामुळे सर्वच मतदान केंदावर दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारचा एक तासाभराचा वेळ वगळता सायंकाळी साडेतीन ते साडेपाचपर्यंत पुन्हा मतदानासाठी केंद्रावर गर्दी झाली होती. जत शहरात मागे ग्रामपंचायत असताना आणि पहिल्या पालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी 68 ते 70 टक्यांवर होती. यावेळी मात्र प्रथमच चुरशीने 75 टक्क्यांचा आकडा पार झाला आहे. जत शहराच्या इतिहासात प्रथमच मतांची टक्केवारी इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

प्रभाग पाचमध्ये मतदान यंत्र बदलले

प्रभाग पाचमध्ये सकाळी बुथ क्रमांक दोनवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने पंधरा मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी येथील मतदान यंत्र बदल्यानंतर मतदान सुरू झाले. तर प्रभाग पाच व प्रभाग चारमध्ये प्रत्येकी एका बोगस मतदानामुळे तणाव झाला होता. येथे अधिकाऱयांनी दुरूस्ती केल्यानंतर तणाव निवळला.

किरकोळ बाचाबाची

शहरात लक्षवेधी मानल्या जाणाऱया प्रभाग एक, चार, तीन, पाच, सात, नऊ, आठ आणि दहा येथे किरकोळ प्रकारचे वाद, बाचाबाची आणि शाब्दिक चकमक वगळता शहरात सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे निवडणुकीचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने जत शहरात व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता. उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी मतदान शांततेत होण्यासाठी विशेष काम केले. विशेष दंगल पथक तसेच 150 अतिरिक्त पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती.

नेत्यांचा दौरा

जत पालिकेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशी लढत होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे, काँग्रेसचे विक्रमदादा सावंत, भाजपाचे आ. विलासराव जगताप, डॉ. रवींद्र आरळी यांनी दिवसभर शहरातील मतदान केंद्रावर ठाण मांडले होते. सर्वच केंद्रावर नेत्यांचे दौरे सुरू होते.

दीड तासात निकाल हाती

पालिका निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय गोदामात होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दहा प्रभागासाठी दह टेबल लावण्यात येणार आहेत. यासाठी एकाचवेळी मतदान मोजणीस सुरूवात होईल. दीड तासात मोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. चार फेऱयांमध्ये मोजणी पूर्ण होईल व एकाचवेळी सर्व प्रभागाचे विजयी उमेदवार घोषीत करण्यात येतील, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे व सहाय्यक अधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

निकालाची उत्कंठा

जत पालिकेसाठी प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. शिवाय प्रभाग रचनेनुसार नव्याने बनणारे वीस नगरसेवक कोण याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना यापैकी मतदार कुणाच्या गळय़ात विजयमाला घालणार यावर पैजाही लागल्या आहेत.

कर्मचाऱयाला आली फीट

शहरातील प्रभाग दोनमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी राजेश परांडे हे निवडणुकीचे कामकाज करीत असताना अचानक त्यांना फीट आली. त्यांच्यावर तातडीने वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी उपचार केला. त्यानंतर येथे दुसरा कर्मचारी नियुक्त करण्यात आला.