|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रोजंदारीवरील कामगारांचा मडगाव नगराध्यक्षांना घेराव

रोजंदारीवरील कामगारांचा मडगाव नगराध्यक्षांना घेराव 

प्रतिनिधी’/मडगाव

ट्रकवर कचरा उचलण्याचे काम करणाऱया कामगारांच्या कामाच्या आदेशाचे नूतनीकरण मागील 11 दिवस न केल्याच्या तसेच दिवसाकाठी मिळणारे वेतन 500 रुपयांवर न नेल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या रोजंदारीवरील कामगारांनी सोमवारी दुपारी मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांना घेराव घातला. कामाचा आदेश व वेतनवाढीची लेखी हमी मिळाल्यानंतरच त्यांनी माघार घेतली. 

मडगाव पालिकेकडून फातोर्डातील सहा प्रभागांमध्ये घरोघरी कचरा उचल मोहीम राबविण्यात येत असून त्याची जबाबदारी ‘बापू’ नामक खासगी यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. हे काम करणाऱया कामगारांना 500 रुपये प्रतिदिन याप्रमाणे वेतन देण्यात येत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पालिकेत रोजंदारीवर कचरा उचल, रस्त्यावरील सफाई व अन्य दुरुस्तीकामे करणारे कामगार संतप्त झाले होते. ‘बापू’ यंत्रणेच्या कामगारांना जितके वेतन मिळते तितकेच आपल्यालाही मिळावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली होती.

नगराध्यक्षांना धरले धारेवर

त्यानुसार घरोघरी कचरा उचल करणाऱया कामगारांचे वेतन वाढविण्यात आले होते, मात्र ट्रकवर काम करणाऱया तसेच रस्त्यावरील सफाई व अन्य दुरुस्तीकामे करणाऱया रोजंदारीवरील कामगारांचे वेतन वाढविण्यात आले नव्हते. त्याशिवाय डिसेंबर महिना लागून 11 दिवस उलटले, तरी ट्रकवर काम करणाऱया कामगारांना कामाचा आदेश देण्यात आला नव्हता. त्यातच रविवारी ट्रकवरील एक कामगार खाली पडून जखमी होण्याची घटना घडली. या साऱयांमुळे संतप्त झालेल्या सदर कामगारांनी सोमवारी नगराध्यक्षांना घेराव घालून धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस उपस्थित होते तसेच काही नगरसेवकही त्या कामगारांच्या सोबत आले होते. सदर नगरसेवकांनी कामगारांची मागणी रास्त असल्याचे नगराध्यक्षांना सुनावले.

मागण्या मान्य झाल्यावर माघार

कामाचा आदेश व वेतन वाढवून 500 रुपयांवर नेण्याची हमी देणारे पत्र मिळाल्यावरच या कामगारांनी घेराव मागे घेतला. ‘बापू’ यंत्रणेच्या कामगारांना दोन महिने आधी कामाचा आदेश देण्यात आला होता. पण तेव्हापासून आम्हाला 323 रुपये प्रतिदिन याचप्रमाणे वेतन मिळालेले आहे. त्यामुळे वाढीव वेतनानुसार मागील दोन महिन्यांचा फरकही चुकता करावा, अशी मागणी सदर कामगारांनी केली असता ती मान्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.

निर्णय पालिकेच्या अंगलट

घरोघरी कचरा उचल मोहिमेसाठी ‘बापू’ नामक यंत्रणेची करण्यात आलेली नियुक्ती वादाच्या भोवऱयात सापडलेली आहे. ही बाब तसेच त्यांच्या कामगारांना प्रतिदिन 500 रुपये वेतन चुकते करण्याचा निर्णयही पालिकेच्या अंगलट आला असून 45 कामगारांच्या जागी आता 200 कामगारांना दिवसाकाठी 323 रुपयांऐवजी 500 रुपये फेडण्याची पाळी आली आहे.