|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नौदलाच्या इतिहासाचे साडवलीत उघडले पुस्तक!

नौदलाच्या इतिहासाचे साडवलीत उघडले पुस्तक! 

पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘हिस्टेरीया 2017’ प्रदर्शनाचे उद्घाटन

साडेतीन वर्षापूर्वीचा सिंधु संस्कृतीचा शिक्का ठरला आकर्षण

वेगवेगळय़ा युध्दात वापरलेल्या साधनसामुग्रीचाही समावेश

प्रतिनिधी /देवरुख

भारतीय नौदलाचा संपूर्ण इतिहास उलगडणाऱया थरारक अशा प्रवासाची कहाणी… सोबत साडेतीन हजार वर्षापूर्वीचा सिंधु संस्कृतीचा शिक्का, 1971 मधली गाझी पाणबुडीचा दरवाजा… त्याचबरोबर युध्दात वापरलेल्या तोफा, बंदुका आदी गोष्टी साडवलीतील पी. एस. बने इंटनॅशनल स्कूलमध्ये पहायला मिळत आहे. निमित्त ठरले आहे ते, हिस्टेरीया 2017 चे प्रदर्शन. हे प्रदर्शन 13 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

भारतीय नौदलाच्या निर्मितीपासून ते आजतागायत वेगवेगळय़ा युध्दामध्ये वापरण्यात आलेल्या साधनसामुग्री व इतर देशांच्या नौदलांकडून जिंकून आणलेले अवशेष जिल्हावासियांना पहायला मिळत आहेत. देशातील पहिले प्रदर्शन भरवण्याचा मान संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे. यापूर्वी कधीही नौदलाने आपल्या सामुग्री व युध्द अवशेषांचे प्रदर्शन केले नव्हते. जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन होत आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी नौदलाचे कमांडर ओडकर जॉन्सन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी आमदार सुभाष बने, पंचायत समिती सभापती सारिका जाधव, जि. प. शिक्षण सभापती दीपक नागले, तहसीलदार संदीप कदम, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, लांजा सभापती दिपाली दळवी उपस्थित होत्या.

या प्रदर्शनात साडेतीन हजार वर्षापूर्वीचा सिंधु संस्कृतीमधील शिक्का आकर्षणाचा ठरला आहे. सिंधु संस्कृतीमधील शिक्का हा नौका चित्रणाचा सर्वात जुना पुरावा मानला जातो. प्रिझमप्रमाणे तीन बाजू असणाऱया या शिक्क्यावर एका बाजूस नौकेचे चित्रण करण्यात आले आहे. मोहंजोदडो येथे हा शिक्का सापडला. यामध्ये असलेल्या नौकेच्या चित्रावर मध्यभागी माडाच्या झाडाचे दृश्य रचना असून दोन्ही बाजूंनी पक्षी चितारलेले आहेत. या शिवाय नौकेची दोन वल्हेही दाखवलेली आहेत. त्याचबरोबर 1971 मध्ये समुद्रात भारत-पाकिस्तान संघर्षातील पाकिस्तानी पाणबुडी गाझीचे काही अवशेष (दरवाजा) येथे पहायला मिळत आहे.

तसेच युध्दात वापरण्यात आलेल्या तोफा, बंदुका तसेच बॉम्ब टाकण्याचे यंत्र हे ही येथे पहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय नौदल आणि साहसी मोहिमा याचेही येथे वर्णन सांगितले जात आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासाबरोबरच चंदन यात्रा, परकीय शक्ती, मराठा आरमार, आयएनएस गोदावरी व खुकरी नौकांचे प्रकार याचीही माहिती अभ्यासगतांना दिली जात आहे. यामुळे हे आगळेवेगळे प्रदर्शन विद्यार्थी व युवकांना महत्वपूर्ण ठरणार आहे.