|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रालोआच्या संयोजकपदी अमित शाह ?

रालोआच्या संयोजकपदी अमित शाह ? 

लालकृष्ण अडवाणींना गमवावा लागू शकतो संसदेतील कक्ष

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपचे अध्यक्ष अमित शाह लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संयोजक होऊ शकतात. 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱया संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रालोआ संसदीय दलाचे नेते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतला गेल्यास भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना संसदेतील कक्ष गमवावा लागू शकतो.

संसद भवनाच्या खालच्या मजल्यावर भाजप संसदीय दलाला कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. यात मुख्यत्वे तीन खोल्या आहेत, मोठय़ा खोलीत पक्षाचे खासदार बसतात, एक खोली रालोआ अध्यक्ष/संयोजकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. या कक्षात अडवाणी बसतात. तिसरी खोली राज्यसभेतील भाजपच्या उपनेत्यासाठी देण्यात आली आहे. अडवाणी सध्या रालोआ किंवा भाजपमध्ये कोणत्याही पदावर नसल्याने त्यांना रालोआ संयोजकासाठीचा कक्ष रिकामा करावा लागू शकतो.

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यावर अडवाणी यांच्या कक्षाबाहेरील त्यांची नेमप्लेट हटविण्यात आली होती. त्यानंतर अडवाणी भाजप खासदारांसाठीच्या कक्षातील एका कोपऱयात बसून राहायचे. 3 दिवसानंतर त्यांना रालोआ अध्यक्षाचा कक्ष देण्यात आला. अमित शाह रालोआ संयोजक होणे जवळपास निश्चित असल्याने अडवाणींवर कक्ष रिकामा करण्याची वेळ येऊ शकते.

नियमित हजेरी..

अडवाणी संसदीय अधिवेशनात खासदार म्हणून स्वतःच्या कक्षात सकाळी 11 वाजण्याच्या अगोदर दाखल होतात. ते प्रश्नोत्तराच्या तासात ते नियमित हजर असतात. प्रश्नोत्तरानंतर ते पुन्हा कक्षात परततात, जेथे भाजप आणि इतर पक्षांचे अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी येत असतात.