|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिरवळमधील जबरीचोरी करणाऱया टोळीस मोक्का

शिरवळमधील जबरीचोरी करणाऱया टोळीस मोक्का 

प्रतिनिधी/ सातारा

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्हय़ातील संघटित गुन्हेगारी करणाऱया टोळक्यांचे कंबरडे मोडण्यास सुरूवात केली आहे. जिल्हय़ातील 7 टोळक्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर मंगळवारी शिरवळमधील चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (मुळ रा. ढवळ ता. फलटण सध्या रा. शिरवळ) यांच्या टोळीला मोक्का लावण्यात आला. या टोळीमध्ये नीलेश बाळासो निकाळजे या जनावरांच्या डॉक्टरचाही समावेश आहे.

  दि. 27 एप्रिल रोजी फिर्यादी त्यांची सुन, नात व त्यांच्या घराशेजारील महिला या केदारेश्वर मंदिरा जवळून शिरवळमधील बाजारपेठेत निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून येवून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून पळून गेले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याचा तपास करून यामधील प्रमुख आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे, डॉ. नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव ता. फलटण) व अक्षय शिवाजी खताळ रा. बिबी ता. फलटण हे आरोपी निष्पन्न झाले होते. गुन्हय़ाचा अधिक तपास केला असता, टोळीप्रमुख चंदर लोखंडे व त्यांच्या सदस्यांवर शिरवळ, लोणंद, फलटण, ग्रामीण, खंडाळा, सातारा शहर, सातारा तालुका, कळंबोली (रायगड), पनवेल (जि. रायगड) या ठिकाणी दरोडा, दरोडय़ाची तयारी, बलात्कार, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचा प्रमुख चंदर हा स्वत:चा व आपल्या टोळीतील सदस्यांचा आर्थिक फायदा करण्यासाठी हे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

  या टोळीबाबत शिरवळचे पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली आहे. याचा तपास फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे करीत आहे.

   या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना द्यावी, तसेच या संघटित टोळी विरूद्ध काही तक्रारी असल्यास पोलीस ठाण्यात दाखल कराव्यात, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

चौकट-

जिल्हय़ातील 8 टोळ्यांना मोक्का

सर्वसामान्य लोकांना, महिलांना खाजगी सावकारीद्वारे, जबरीचोरी चेनस्नॅचिग, दरोडा, खंडणीसाठी, दहशत निर्माण करून टोळी जमवून स्वत: चा आर्थिक फायदा करून घेणाऱया सातारा जिल्हय़ातील संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत प्रमोद उर्फ खंडय़ा धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव व अनील कस्तुरे या सात जणांच्या टोळीला मोक्का लावला आहे. आता यामध्ये चंदर लोखंडे टोळक्याची भर पडली आहे. आगामी काळात सातारा जिल्हय़ातील दहशत करून जबरीचोरी करणाऱया आणखी काही टोळक्यांविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.