|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आजपासून विधानसभा अधिवेशनला प्रारंभ

आजपासून विधानसभा अधिवेशनला प्रारंभ 

प्रतिनिधी/ पणजी

चार दिवशीय अधिवेशनाला आज बुधवार 13 डिसेंबरपासून सुरवात होत असून ते सोमवार 18 पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा गाजणार आहे. विरोधी काँग्रेस पक्ष विविध विषयावरून सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. कोळसा प्रदुषणाचा विषयही विधानसभेत गाजण्याची शक्यता आहे.

अधिवेशनासाठी 703 प्रश्न आले असून त्यापैकी 242 तारांकीत तर 461 प्रश्न अतारांकित आहेत.

चार महत्वाची दुरुस्ती विधेयके

चार विधेयके येणार आहेत. कृषी उत्पन्न पणन मंडळ हे सध्या 23 सदस्यांचे असून ते 18 पर्यंत आणण्याची  महत्त्वाचे विधेयक यावेळी विधानसभेत येणार आहे. गोव्याचे कृषी उत्पादन, विक्री क्षेत्र आणि एकूणच कृषी विकासाच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर गोवा भूमहसूल कोड दुरूस्ती विधेयक, नगर नियोजन दुरूस्ती विधेयक येणार आहे. साधनसुविधा कर दुरूस्ती विधेयकही येणार असून त्याद्वारे गोवा सरकार जे प्रकल्प राबवणार त्यांना पायाभूत सुविधा करातून वगळण्याची तरतूद करण्यात येईल. आमदार व मंत्र्यांच्या वेतनात सुधारण करणाऱया दुरुस्ती विधेयकाला या अधिवेशनात मुहुर्त सापडलेला नाही.

नद्यांच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा गाजणार

यावेळी विधानसभेत नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा बराच गाजण्याची शक्यता आहे. सध्या नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच पर्यावरणवादी संघटना व अन्य बिगर सरकारी संघटनाही सरकारविरोधात सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभेत आणि या काळात या बाहेरही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. 11 डिसेंबर रोजी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खुल्या चर्चेवेळी काँग्रेस आणि काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा विरोध केला होता. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुद्यावर गोंय, गोंयकारपणाचा मुद्दा लावून धरून विधानसभेत तीन आमदार पोचविलेल्या गोवा फॉरवर्ड व नेते विजय सरदेसाई यांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

अनेकांच्या निधनाबद्दल दुखवटय़ाचे ठराव

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्व. अमृत कासार, माजी आमदार दुलो कुट्टीकर, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू, कवी युसूफ शेख, हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका गिरीजा देवी व सुहासिनी कोरटकर, माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजनदास, पं. नारायणराव बोडस, जयसिंग मगनलाल, डॉ. जे. सी. आल्मेदा, शशी कपूर, जगन्नाथ पेडणेकर, बळवंतराव देसाई, ह. मो. मराठे, वासू नाईक, अर्जून सिंग, गणपत पुनाळकर, रवी जोगळेकर, महाबळेश्वर रेडकर, श्रीधर फडके यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

पर्वरी, पणजी परिसरात 144 कलम लागू

अधिवेशनाच्या काळात उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांनी पर्वरी सचिवालयाच्या 500 मीटर अंतरावर आणि पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 144 कलम लागू करणारा आदेश जारी केला आहे. त्यानुसार पाच किंवा जास्त नागरिकाना एकत्र राहता येणार नाही. लाठी, तलवारी, बंदुका यासारखी शस्त्रs बाळगता येणार नाही. फटाके उडविणे, ध्वनिवर्धकांचा वापर, नारेबाजी यावर बंदी असेल. मात्र डय़ुटीवर असलेले सरकारी कर्मचारी, विवाह समारंभ व अत्यंयात्रेला या बंदीतून वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागिय न्यायदंडाधिकारी यांच्याकडून यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे.

Related posts: