|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘सवाई’ला सुरेल सुरुवात

‘सवाई’ला सुरेल सुरुवात 

 पुणे / प्रतिनिधी :

सनईवादक मधुकर धुमाळ यांच्या सुरेल सनईवादनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी प्रारंभ झाला. डॉ. विजय राजपूत, देबाशीष भट्टाचार्य यांनीही या मैफलीत रंग भरले.

आर्य प्रसारक मंडळाच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष आहे. धुमाळ यांनी राग ‘भीमपलास’ रागाच्या सुरावटींनी आपल्या वादनाची सुरुवात केली. सुमारे पाऊणतास त्यांनी या रागाचे सौंदर्य उलगडून दाखविले व रसिकांची वाहवा मिळवली. त्यांना भरत कामत (तबला), विजय बेलबन्सी, ओंकार धुमाळ (सनई) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. विजय राजपूत यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी ‘पूरिया कल्याण’ या रागातील विलंबित ताल सादर करून रसिकांची दाद मिळवली. यानंतर दादरा तालातील राग ‘पिलू’चे सौंदर्य उलगडून दाखविले. यानंतर त्यांनी ‘मोरे कान्हा जो आए पलट के’ हे भजन सादर करून वातावरण भक्तिमय करून टाकले. त्यांना रविंदकुमार सोनी (तबला), प्रा. डेव्हिड क्लार्क, सुनील रावत (तानपुरा), वसंत गरुड (टाळ) यांनी साथसंगत केली.

देबाशीष भट्टाचार्यांच्या मधुवंतीचे माधुर्य

डॉ. राजपूत यांच्यानंतर चतुरंगी (स्लाईड गीटार) वादक देबाशीष भट्टाचार्य यांचे  स्वरमंचावर आगमन झाले. त्यांचे वादन वैशिष्टय़पूर्ण ठरले. त्यांनी ‘मधुवंती’ रागातील आलाप, जोड, धुपद सादर करून विशेष दाद मिळविली. यानंतर ‘झपताल’ आणि ‘तिनताल’ रागातील स्वराविष्कारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. चतुरंगी आणि पखवाज यांच्या जुगलबंदीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांना शुभाशीष भट्टाचार्य (तबला) आणि अखिलेश गुंदेचा (पखवाज) यांनी साथसंगत केली.