|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुश्मन भी मिला…. तो सिवा जैसा….!

दुश्मन भी मिला…. तो सिवा जैसा….! 

प्रतिनिधी / बेळगाव

‘जाणता राजा’त नायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि या नाटकातील खलपुरुष ठरतो तो औरंगजेब. शिवरायांना नामोहरम करून नेस्तनाबूत करण्यासाठी तो आपले अनेक सरदार पाठवितो. मात्र, ते अपयशी ठरतात. यामुळे चिडलेला औरंगजेब आपल्याच सरदारांवर आगपाखड करताना म्हणून जातो ‘शिवाजी हर बार क्मयुँ जितता है? क्मयौं की ओ नेक हैं, हमे दुश्मन भी मिला तो सिवा जैसा…!’ दमदार संवाद आणि तशाच अभिनयाच्या जोरावर ‘जाणता राजा’त औरंगजेब गाजतोय. रसिकांच्या मनात शिवप्रेमाचा जागर निर्माण करण्यात महानाटय़ातील हे पात्रही महत्त्वाची भूमिका निभावून जाते.

ही कसदार भूमिका गेल्या 33 वर्षांपासून करताहेत पुण्याचे डॉ. अजित आपटे. त्यांच्याशी बातचित करता औरंगजेब या पात्राची आणि त्यामागील व्यक्तीची कल्पना येऊन जाते. आपल्या माणसांकडून काहीच होत नाही. काही केल्या शिवाजी जेरबंद होत नाही. अशा परिस्थितीत जखडलेल्या औरंगजेबाची अवस्था त्याच्या संवादांतून जाणवते. बोलता बोलता तो शिवाजी महाराजांच्या चांगल्या गुणांकडे येतो. नकळत त्यांची स्तुती करू लागतो. सरते शेवटी त्याच्या पोटात दडलेली दुश्मनी लपून राहत नाही आणि तो म्हणून जातो ‘कुछ भी हुवा तो है हमारा दुश्मन ही ना? उसे नामोहरम करो…’

औरंगजेबाचे संवाद ‘जाणता राजा’च्या पेक्षागृहात टाळय़ांचे कडकडाट मिळवून जातात. शिवरायांची स्तुती करतानाचा औरंगजेब स्वतःच नामोहरम झालेला असतो आणि नंतर तो चित्कारतो. हे सारे त्याच्या संवादातील भावनिक उलथापालथीचे क्षण डॉ. अजित आपटे यांनी तितक्मयाच ताकदीने निभावले आहेत. या संदर्भात विचारले असता ही भूमिका फार महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. इतकी वर्षे ही भूमिका करताना सराव झाला आहे. मात्र, इतिहासाचा आढावा घेता एका मराठी राजाला संपविण्यासाठी एका मुसलमान सम्राटाला किती शिकस्त करावी लागली, याची कल्पना येऊन जाते, असेच ते सांगतात.

‘जाणता राजा’मधील ही भूमिका करताना बरेचसे आव्हान असते. मात्र प्रत्येक ठिकाणी तिला मोठा प्रतिसादही मिळून जातो. रसिक शिट्टय़ा आणि टाळय़ा वाजवायला लागतात. बेळगावच्या रसिकांची तर गोष्टच वेगळी आहे. बेळगावात चांगला प्रतिसाद आणि दाद देणारे कलाकार आहेत. यामुळे येथे काम करायला आवडते, असे त्यांनी सांगितले.