|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमदार कत्तींनी केलेली जातीय अवहेलना निंदनीय

आमदार कत्तींनी केलेली जातीय अवहेलना निंदनीय 

वार्ताहर/ चिकोडी

हुक्केरी मतदारसंघाचे आमदार उमेश कत्ती यांनी दलित समाजाची केलेली जातीय अवहेलना निंदनीय असून त्यांच्या निषेधार्थ 18 रोजी सकाळी चिकोडी तालुक्यातील सर्व दलित समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बेळगाव जिल्हा दलित संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुदर्शन तम्मन्नावर यांनी सांगितले.

ते येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. तम्मन्नावर म्हणाले, दलित समाजास संविधानबाह्य शब्द वापरणे चुकीचे आहे. ते स्वतः एक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्यावर ऍट्रासिटी केस दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना पुढील दहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी मज्जाव करण्यात यावा, अशी उपप्रातांधिकाऱयांमार्फत राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

 दलित नेते बसवराज ठाके यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीची त्यांनी निंदा केली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी चिकोडी भीमनगर येथून मोर्चा काढून के. सी. रोड, बसस्थानक, निपाणी-मुधोळ रस्तामार्गे बसव सर्कलला मानवी साखळी करून घेराव घालणार आहोत. नंतर मिनी विधानसौधला जाऊन प्रांताधिकाऱयांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. दलित नेते अशोक भंडारकर यांनी, आमदार कत्तींनी चुकीचा शब्द वापरून दलित समाजाचा अपमान केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सर्व दलित बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे सांगितले.

यावेळी शशिकांत फकिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी निरंजन कांबळे, महांतेश कुरणे, श्रीकांत कांबळे, संदीप शिंगे, सुभाष बेलेकर, सिद्धार्थ कांबळे, पिंटू माळगे, अर्जुन माने, संपद घस्ते, सुजाता कांबळे, विनोद चितळे, रवी घस्ते, संदीप भोसले आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.