|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दहा एकरातील उसाला अज्ञातांकडून आग

दहा एकरातील उसाला अज्ञातांकडून आग 

वार्ताहर /बेडकिहाळ :

येथील नारे मळा परिसरातील दहा एकरातील उसाला अज्ञातांनी आग लावल्याची घटना 14 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण आगीने क्षणात रौद्ररुप धारण केल्याने घटनास्थळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील भागातील ऊस बचावला. घटनास्थळी उदबत्ती सापडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नारे मळा परिसरात कलगोंडा बी. नारे, कुमार बी. नारे, कुबेर बी. नारे तसेच जवाहरचे संचालक अशोक तिप्पाण्णा नारे यांची दहा एकर शेती आहे. याठिकाणी उसाची लावण करण्यात आली आहे. अज्ञातांनी दुपारी उसाला आग लावल्याने क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले.

 या घटनेत शेतात टाकण्यात आलेले ठिबकचे 90 हजारांचे साहित्यही जळून खाक झाले आहे. घटनास्थळी जवळपास 10 उदबत्ती सापडल्या. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास काळे जॅकेट परिधान केलेली व्यक्ती शेत परिसरातून गेल्याचे काही महिलांनी सांगितले.

आगीची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररुप धारण केल्याने सदलगा अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत दहा एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. कोलकर, व्ही. एन. अडोडगी, एम. एम. अथणी, जी. व्ही. बनशंकरी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related posts: