|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अपंग शेतकऱयाच्या जिद्दीचा फुलला शेतमळा!

अपंग शेतकऱयाच्या जिद्दीचा फुलला शेतमळा! 

चिपळूण तालुक्यातील पिंपळी गावचे विश्वासराव शिंदे यांची यशोगाथा

दोन्ही हात नसतानाही थक्क करणारा यशस्वी प्रवास

आत्महत्या करणाऱया महाराष्ट्रातील शेतकऱयांना ठरेल प्रेरणादायी

 

विजय पाडावे /रत्नागिरी

आज माणूस थोडय़ा-थोडय़ा अडचणी आल्या तरी आयुष्यात निराश होताना दिसतो. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी माणूस अनेकदा हतबल होतो. ही झाली धडधाकट माणसांची अवस्था. पण आपल्यापेक्षाही कठीण परिस्थितीत अनंत अडचणींवर मात करत काही लोक आनंदाने जीवन जगतात. आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, खचून अगतिक न होता भावी जीवनाचा आनंद अधिक फुलवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. अशाच एका चिपळूण तालुक्यातील पिंपळी गावचे शेतकरी विश्वासराव शिंदे यांनी आलेल्या अपंगत्वावर मात करत फुलवलेला शेतमळय़ाची किमया कोकणासह अख्या महाराष्ट्रातील शेतकऱयांना प्रेरणादायी ठरणार आहे.

आज महाराष्ट्रात शेतकऱयांच्या आत्महत्यांच्या घटनांनी येथील बळीराजाची हतबलता जगासमोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून होत असलेल्या या आत्महत्यांचे सत्र आजही थांबलेले नाही. महाराष्ट्राचा विचार करता ही परिस्थिती विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र या भागात प्रामुख्याने समोर येते. पण त्याला कोकण अपवाद ठरला आहे. येथील शेतकरी कर्जबाजारी जरी झाला तरी आपली मानसिकता ढळू देत नाही. त्यामुळेच येथे शेतकऱयांच्या आत्महत्या होत नाहीत. आपल्यावर आलेल्या संकटावर मात करत जिद्द व चिकाटी, धडपड कायम राखतो. याची एक नाही तर अनेक उदाहरणे या ठिकाणी दिसून येतात.

..परंतु नियतीपुढे टेकले नाहीत हात

अशाच एका जिद्दी शेतकऱयाच्या संघर्षाची कहाणी तमाम शेतकऱयांसमोर प्रेरणा देणारी ठरली आहे. चिपळूण तालुक्यातील पिंपळी गावचे शेतकरी विश्वासराव शिंदे यांचे जिवंत उदाहरण देता येईल. जिद्द असलेल्या माणसाला कोणतीही अडचण मागे रोखू शकत नाही, हे त्यांनी साऱयांनाच दाखवून दिले आहे. विश्वासराव हे सुरूवातीच्या काळात सेट्रींगचे काम करत असत. पण हे काम करताना त्यांना झालेला अपघात त्यांच्या पुढील जीवनासमोर प्रश्न उभा ठाकला. त्या अपघातात त्यांना दोन्ही हात गमवावे लागले. परंतु ते नियतीपुढे हरले नाहीत. त्या कठीण प्रसंगातून ते जिद्दीने उभे राहिले.

शेतातील सारी कामे करतात लिलया

दोन्ही हात नसतानाही आपल्या भावी जीवनाच्या जिद्दी प्रवासाला सुरूवात केली. शेतीत नवी क्रांती करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. शेती करणे हे कष्टदायी काम. त्यासाठी धडधाकटपणा अंगात असावा लागतो. हातशिवाय शेती कशी होऊ शकते, असे अनेकांनी त्यांना विचारले देखील. काहींनी त्यांना मुर्खात देखील काढले. मात्र विश्वासरावांनी त्यांच्याच शेतीच्या कामातूनच सर्वांनाच त्यांच्या भुवया उंचावून बोटे तोंडात घालायला लावली आहेत. शेत खणण्यापासून पॉवर टिलर, फावडय़ाने माती उपसणे, रोपांची देखभाल करणे अशी एक नव्हे तर शेतातील सारी कामे हात नसतानाही ते लिलया करतात.

त्यांच्या जिद्दीला कुटुंबाची साथ

त्यामुळेच विश्वासरावांनी आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर शेतमळा फुलवलेला आहे. सुमारे 2 एकर क्षेत्रावर कलिंगडाचे पिक घेतले आहे. अर्धा एकरवर वांग्याची बाग फुलवली आहे. त्यातच दोडकी, कारली, पालेभाजी अशा विविध पिकांना त्यांनी जणू बहर आणला आहे. अपंगात्वर मात करत त्यांनी आपलं शिवार फुलवलेले पाहून त्यांचा हा शेतीचा प्रवास इतर शेतकऱयांनाही नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे. विश्वासराव पिकांबाबतीत योग्य व्यवस्थापन करून ते चांगले उत्पादन कसे घेता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष देतात. शेतीबरोबरच त्यांना दुग्ध व्यवसायाची जोड देखील मिळाली आहे. त्यांच्या या जिद्दीला त्यांचे सर्व कुटुंब शेतात सहकार्य करते. त्यांची पत्नी माधवी, मुलगा विशाल यांची मदत मोलाची ठरते.

विश्वासराव युवकांसाठी आज प्रेरणास्थान

विश्वासराव गावातील इतर युवकांसाठी आज प्रेरणास्थान बनले आहेत. शेतात ते हिरीरीने काम करताना पाहून मोठय़ा उत्साहाने अनेकजण कामाला लागले आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱयांनीही त्यांची जिद्दी कहाणी ऐकून शेतावर भेटी देत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. अपघाताने आलेले अपंगत्व, हसतमुखाने स्वीकारून सतत काम करत राहणे, हा त्यांचा मूलमंत्र आहे. त्यांच्या या जिद्दीचा प्रवास हाताला काम नाही, म्हणून बेकार हिंडणाऱया व लोकांपुढे लाचारीने हात पसरणाऱयांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे.

 

दोन्ही हात अपघातात गमावलेले असताना आपण काही करू शकत नाही असा साऱयांच्या मनात समज झाला होता. मी शेती करेन यावर लोकांचाही भरोसा नव्हता. पण मनाशी जिद्द बाळगली. हात नसल्याने मला काम कोण देणार हा प्रश्न होता. त्यामुळे दुसरा पर्यायही नव्हता. शेती हा एकमेव पर्याय उभा होता. वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवावा. यासाठी गावातील अरुणशेट रहाटे यांनी खऱया अर्थाने जगण्याचा मार्ग दाखवला.

विश्वासराव शिंदे…….