|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तांदूळ व्यापारी अपहरण प्रकरणी हरियाणातील एकाला अटक

तांदूळ व्यापारी अपहरण प्रकरणी हरियाणातील एकाला अटक 

प्रतिनिधी/ सांगली

येथील तांदुळ व्यापाऱयाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी मोहमद शाहाबुदीन हातीन (वय 22 रा रूपवाडा, ता हातीन जि पलवल हरियाणा) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह अन्य तीन बेपत्ता असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

तांदूळ देण्याच्या बहाण्याने व्यापारी अबीद अरबानुर शिवाणी याला हरियाणा येथील एकाने मोबाईलवर संपर्क साधून बोलावून घेतले. दिल्ली येथे गेल्यानंतर त्याचे अपहरण करून बारा लाखांची खंडणी मागितली. यानंतर व्यापारी अबीद याचा भाऊ अमिनने याप्रकरणी शहर पोलिसात अपहरण आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला.

यानंतर शहर पोलीस ठाण्याचे गुंडा विरोधी पथकाने दिल्ली व हरियाणा पोलिसांच्या मदतीने तेथे जावून मोहमद हातीनला ताब्यात घेतले. त्याला सांगलीत आणले आहे. न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत माहिती देताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष डोके म्हणाले, आरोपीने व्यापारी अबीदच्या भावाला फोन करून तीन लाख रूपये खात्यावर भरण्यास सांगितले.

 बँकेचे नावासह संपूर्ण माहिती घेवून आम्ही हरियाणातील हातीन येथील कॅनरा बँकेत गेलो असता अटक केलेला मोहमद हातीन दीड लाखाचा धनादेश घेवून पैसे काढण्यासाठी तेथे आला असता त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणामध्ये चौघांचा सहभाग असून मुख्य़ सुत्रधारासह आणखी तिघे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सु आहे.

आरोपींनी एक डिसेंबर रोजी कॅनरा बँकेत खाते काढले असून फसवणूकीचा त्यांचा उदयोग असण्याची शक्यता यावेळी एपीआय डोके यांनी व्यक्त केली. आरोपींनी गुन्हयात वापरलेली रिटझ गाडी तसेच मोबाईल याशिवाय आणखी तीन आरोपी अटक करायचे असल्याने न्यायालयात अटक केलेल्या आरोपीला जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी देण्यातची मागणी केली. याचा विचार करून न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

ही कारवाई करण्यामध्ये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. गुंडा विरोधी पथकामध्ये हवालदार अरूण अवताडे, मेघराज रूपनर, आर. एन. देसींगकर, बिरोबा नरळे यांचा समावेश होता.