|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वणव्यात गुरांच्या वाडय़ासह भाताची उडवी जळून खाक

वणव्यात गुरांच्या वाडय़ासह भाताची उडवी जळून खाक 

मंडणगडात तिडे-येसरेवाडीतील दुर्घटना

भाताचे 900 भारे जळून लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /मंडणगड

तालुक्यातील तिडे-येसरेवाडी येथे लागलेल्या वणव्यात शेतकरी दयानंद येसरे यांचा गुरांचा वाडा व 900 भाऱयांची भाताची उडवी शनिवारी जळून खाक झाल्याने लाखाचे नुकसान झाले आहे.

या घटनेचे वृत्त कळताच सभापती आदेश केणे व जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱयाचे सांत्वन करुन नुकसानीची पाहणी केले. या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तिडे-येसरेवाडी येथील जंगल परिसरात सकाळी उन्हे पडण्याच्या सुमारास लागलेल्या वणव्यात शेतकरी दयानंद येसरे वर्षभर मेहनत करुन पिकवलेले धान्य व त्यांच्या मालकीचा गुरांचा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत येसरे यांचे मळणी न केलेले 900 भारे जळून खाक झाल्याने त्यांची वर्षभराची मेहनत फुकट गेली. याचबरोबर त्यांचा वाडाही जळून खाक झाला, मात्र यावेळी वाडय़ामध्ये त्यांचे पशुधन बांधलेले नसल्याने पशूधनाची हानी टळली. आग लागून त्यांचे सुमारे लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.