|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राहुल पर्व सुरू

राहुल पर्व सुरू 

मोठी परंपरा आणि दीर्घ वाटचाल असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुकुट राहुल गांधी यांनी शनिवारी स्वीकारला आणि सोनिया गांधींनी आपली 20 वर्षांची अध्यक्षपदाची कारकीर्द थांबवून मोठय़ा प्रेमाने व जबाबदारीने तो राहुल गांधींच्या डोक्यावर ठेवला. निवड तर बिनविरोधच झाली होती. अध्यक्षपदाचा हा मुकुट सन्मानाचा, अभिमानाचा आणि अधिकाराचा जसा आहे तसा तो जबाबदारीचा, कसोटीचा आणि काटेरीही आहे. ओघानेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा कस लागणार हे उघड आहे. राहुल बदलत आहेत. पप्पू ते प्रधान आणि पंतप्रधान असा त्यांचा प्रवास फार दूरचा नाही अशी काँग्रेस गोटातील हवा आणि गुजरातच्या मोदींच्या होम पिचवर राहुलनी त्यांना फोडलेला घाम या साऱया पार्श्वभूमीवर त्यांची पावले कशी पडतात हे बघावे लागेल. भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसचा राजकीय पक्ष म्हणून उदय झाला. वाटचालीत काँग्रेसमध्ये उभ्या-आडव्या फुटी पडल्या. इंडिकेट-सिंडीकेट वगैरे संघर्ष झाले. यशवंतराव चव्हाण, चव्हाण-रेड्डींची ‘चड्डी’ काँग्रेसही निघाली. पवारांची समाजवादी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण, गांधी-नेहरू परिवाराची काँग्रेस आय ही सतत प्रमुख भूमिकेत राहिली. या काँग्रेसचे राहुल अठरावे अध्यक्ष झाले आहेत. नेहरू गांधी घराण्याचे ते सहावे सदस्य आहेत. ज्यांना या खुर्चीचा मान मिळाला आहे. ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नव्याने खुर्चीवर बसत असले तरी पक्षात गेली अनेक वर्षे ते प्रमुख भूमिकेत आहेत. सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद व नेतृत्व स्वीकारले तेव्हाही आजच्या सारखाच काँग्रेसला कठीण काळ होता. काँग्रेस देशात आणि अनेक राज्यात विरोधी बाकावर होती. मंडल-मंदिर सारखे, प्रमुख मुद्दे होते. बोफोर्सचे वादळ घोंगावत होते. सोनिया आणि राहुल यांनी स्व. इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा धक्का सहन केला होता. जबाबदारी म्हणून त्यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आणि सर्व समविचारी मंडळींना सोबत घेऊन युपीए एक आणि युपीए दोन अशी पाठोपाठ दोन वेळा सत्ता मिळवली. भाजपाच्या फिलगूडचा वारु रोखण्याची किमया सोनियांनी साधली. खरे तर याच काळात त्या स्वत: पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, राहुल व प्रियंका यांना मंत्री वा पंतप्रधान करू शकल्या असत्या पण, त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना संधी दिली. पक्षातही राहुल की प्रियांका असे दोन प्रवाह होते पण, सोनियांनी सून, पत्नी, आई या भूमिका योग्य निभावल्या. ‘काँग्रेस कल्चर’ आत्मसात केले आणि अनेक संकटे, आव्हाने, टीका, रोष यांना समोरे जात आपली अध्यक्षीय कारर्कीद पूर्ण केली. अध्यक्षपदाची सूत्रे राहुलच्या हाती सोपवताना त्या सद्गदीत झाल्या. त्यांच्या भावूक भावना अश्रुतून ओघळल्या. इंदिराजींनी मला मुलीसारखे वागवले. इंदिराजींची हत्या झाली तेव्हा मला वाटले माझी आईच कुणी माझ्यापासून हिरावून घेतली. मी स्वत:ला, पतीला व मुलांना राजकारणापासून दूर ठेवू  इच्छित होते. मात्र राजीव यांचेवर मोठी जबाबदारी आली आणि त्यांना पंतप्रधानपद स्वीकारावे लागले. ‘राजीव सोबत मी देशाच्या कानाकोपऱयात दौरे केले. लोकांच्या समस्या, देशापुढील आव्हाने जाणून घेतली’ हे त्यांचे उद्गार त्यांची मनःस्थिती स्पष्ट करतात.’ राहुल गांधींनी आजी आणि वडिलांच्या हत्येचे दु:ख झेलले. राजकारणात व्यक्तिगत भयंकर संकटाना सामोरे गेले. त्यामुळे राहुल निडर, मजबूत, सहनशील व दृढ बनले आहेत. काँग्रेसला तो नवचैतन्य देईल हा त्यांचा विश्वास एका आईचा आहे की पायउतार होणाऱया पदाधिकाऱयाचा आहे,  हे काळ ठरवेल. पण, राहुल गांधींना पक्षात व पक्षाबाहेर स्वत:ला नव्याने सिद्ध करावे लागेल. राहुल गांधी गुजरात निवडणुकीत ज्या तऱहेने उतरले व त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला होमपिचवर जो घाम फोडला तो हिंदुस्तानने बघितला आहे. भाजप तेथे सत्ता राखणार असे अंदाज व्यक्त होत असले तरी मोदी-शहांचा 150 संख्याबळाचा आकडा केव्हाच मागे पडला आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाचा ताज डोक्यावर घेताना त्यांना गुजरातची ही झुंज उपयोगी ठरणार आहे. ‘शत प्रतिशत भाजप’ हे आव्हान परवताना राहुल गांधींची भूमिका काय असणार हे मुकुट डोक्यावर घेताना त्यांनी केलेल्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. द्वेष आणि हिंसा भडकवणाऱया भाजपाला आपण रोखू, भाजपाला रोखण्याची काँग्रेसकडेच शक्ती आहे. आम्ही जोडतो ते तोडतात, ते आग लावतात आम्ही विझवतो, ते राग-राग करतात आम्ही प्रेम करतो असा काँग्रेस व भाजपमधील भेद स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसने 21 व्या शतकात आणलेला भारत भाजपाने पुन्हा मध्ययुगात नेला. आम्ही दोन हात करू, यश मिळवू असा त्यांचा विश्वास काँग्रेसजनांना पुरेसा आहे. राहुलनी काँग्रेसला युवा चेहरा देण्याचे ठरवले आहे. प्रारंभ तर जोरात केला आहे. नजीकच्या काळात कर्नाटकसह आणखी काही राज्याच्या निवडणुका आहेत आणि पाठोपाठ 2019 सालचे लोकसभेचे मैदान आहे. मोदी आणि भाजपा यांची हवा व प्रभाव मंदावतो आहे, असे गुजरात प्रचारावेळी दिसून आले. महागाई, जीएसटी, अच्छे दिन, नोटाबंदी अशा अनेक मुद्दय़ावर सरकारला परिणामकारक काम दाखवता आलेले नाही. फड मारणारी भाषणे आणि निवडणुका जिंकणे म्हणजे राज्यकारभार नव्हे. हे असे काम फार काळ लोक सहन करत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. राहुल गांधींच्यात बदल झाला आहे. ‘पप्पू’ ची इमेज मागे टाकून ते गुजरात निवडणुकीतील प्रधान सेनापती या कसोटीला उतरले. आता तर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेस ओल्ड, गोल्ड व यंग पार्टी करण्याची आणि युवकांना काँग्रेसमध्ये योग्य स्थान देण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. राजकारणात, लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक असे दोन्ही पक्ष प्रबळ असावे लागतात. राहुल गांधींनी सुरुवात तर चांगली केली आहे. मोदी व भाजपा कसे वागतात यावर पुढील संघर्ष निश्चित होईल. तूर्त राहुल गांधींची अध्यक्षपदावर दमदार एन्ट्री झाली आहे. सोनिया पर्व संपून राहुल पर्व सुरू होत आहे.