|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » तिसऱया कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

तिसऱया कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व 

वृत्तसंस्था/ पर्थ

ऍशेस मालिकेतील येथे सुरू असलेल्या तिसऱया कसोटीवर रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व राखले आहे. पावसाचा अडथळा आल्यानंतर इंग्लंडचा संघ अद्याप 127 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेर इंग्लंडने दुसऱया डावात 4 बाद 132 धावा जमविल्या.

इंग्लंडचा संघ आता मालिका वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सलग दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

या तिसऱया कसोंटीत इंग्लंडने पहिल्या डावात 403 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 459 या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने 399 चेंडूत 1 षटकार आणि 30 चौकारांसह 239 धावा तर मिचेल मार्शने 236 चेंडूत 29 चौकारांसह 181 धावा झोपडल्या. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 301 धावांची त्रिशतकी भागिदारी केली. टीम पेनीने सहा चौकारांसह नाबाद 49 तर कमिन्सने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 41 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 179.3 षटकांत 9 बाद 662 धावांवर घोषित करून इंग्लंडवर 259 धावांची भक्कम आघाडी मिळविली. इंग्लंडतर्फे अँडरसनने 4 तर ओव्हरटनने 2 गडी बाद केले. मोईन अली व वोक्स यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

इंग्लंड संघातील वरिष्ठ अनुभवी खेळाडूंना अद्याप सूर मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. इंग्लंडच्या दुसऱया डावात माजी कर्णधार कूक, स्टोनमन, व्हिन्सी आणि कर्णधार रूट लवकर बाद झाले. कूकने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. स्टोनमन 3 धावांवर बाद झाला. व्हिन्सीने 12 चौकारांसह 55 धावांचे योगदान दिले. कर्णधार रूट 14 धावांवर तंबूत परतला. मॅलेन 28 तर बेअरस्टो 14 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप 127 धावांवर पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूडने 2 तर स्टार्क आणि लेयॉन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कसोटीतील खेळाचा शेवटचा दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियन संघ मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. इंग्लंडचा संघ पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करेल.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव 403, ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 662 डाव घोषित (स्टीव्ह स्मिथ 239, मिचेल मार्श 181, ख्वाँजा 50, पेनी नाबाद 49, कमिन्स 41, अँडरसन 4/116, ओव्हरटन 2/110, वोक्स आणि मोईन अली प्रत्येकी एक बळी). इंग्लंड दु. डाव- 38.2 षटकांत 4 बाद 132 (व्हिन्सी 55, कूक 14, स्टोनमन 3, रूट 14, मॅलेन खेळत 28, बेअरस्टो खेळत आहे 14, हॅजलवूड 2/23, स्टार्क, लेयॉन प्रत्येकी एक बळी.)