|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » गुजरातमध्ये मोदी फर्स्टक्लास, राहुलही पास!

गुजरातमध्ये मोदी फर्स्टक्लास, राहुलही पास! 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  :

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणेबाजी मारली असली, तरी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसनेही मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोदी फर्स्टक्लास असले, तरी राहुलही या निवडणुकीत पास झाले, असा या निवडणुकीचा अर्थ लावला जात आहे.

गुजरातमध्ये भाजपा सहज विजय मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. प्रत्यक्षात काँग्रेसने भाजपाला झुंजवले. निकालाच्या सुरूवातीच्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर पहायला मिळाली. मागील निवडणुकीत कशीबशी 57 जागांपर्यंत सीमित असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत 80 जागांपर्यंत झेप घेत भाजपाला धक्का दिला आहे. भाजपाने शतकी आघाडी घेत शतक साजरे केले असले, तरी त्यांना अपेक्षित विजय मिळविता आलेला नाही. या निवडणुकीत आकाश पाताळ एक करीत भाजपाने प्रचार केला, सर्व यंत्रणा कामाला लावली. असे असतानाही पंतप्रधानांच्या राज्यातच त्यांना संघर्ष करावा लागला, असा संदेश या निवडणुकीतून गेला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत कालपरवापर्यंत शंकाकुशंका व्यक्त होत होत्या. मात्र, या निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी सध्या तेच अधिक चर्चेत आहे. त्यामुळे त्यांचे एकप्रकारे प्रतिमासंवर्धन झाल्याचे मानले जात आहे. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, ‘ओबीसी’चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली होती. मात्र, ही आघाडी तितकीशी यशस्वी झाली नसल्याचे निकालातून दिसत आहे. भाजपाने आपली 22 वर्षांपासूनच सत्ता राखली असून, यापुढेही पाच वर्षे राज्यावर पक्षाची सत्ता असेल. मात्र, या निकालाने एकप्रकारे त्यांना धोक्याचाही इशारा दिला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.