|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » न.प.मधील बांधकाम परवानगी आता ‘ऑनलाईन’

न.प.मधील बांधकाम परवानगी आता ‘ऑनलाईन’ 

रत्नागिरीत 15 दिवसात अंमलबजावणी

नकाशे मंजूरीतील घोळ ‘बीपीएमएस’ प्रणालीद्वारे होणार दूर

बांधकाम परवानगीसाठी पालिकेत जाण्याची गरज नाही

कार्यवाहीतील गैरप्रकारांना बसणार पायबंद

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील बांधकामांच्या परवानगीसाठी आता पालिकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ही परवानगी आता ‘ऑनलाईन’ मिळणार असून येत्या 15 दिवसांत या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार असल्याचे रत्नागिरी न. प. मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले. बांधकाम प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूरीच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचीही माहिती ‘ऑनलाईन’ समजणार आहे. त्याबाबत नगर परिषदेची पूर्वतयारी अंतीम टप्प्यात असल्याचे माळी यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आयटी विभागाने नगर पालिकांनाही स्मार्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिकांमधील जुने नकाशे मंजूरीतील घोळ दूर करण्यासाठी ‘बिल्डींग परमिशन मॅनेजमेंट सिस्टिम’ (बीपीएमएस) सुरू करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये हाताने नकाशे तयार करताना होणाऱया चुका टाळल्या जातील, तसेच ‘चलता है’ सारख्या वृत्तीला आळा बसणार आहे. त्यामुळे जलद सेवाही मिळण्यास मदत होणार आहे.

बांधकाम परवानगी घेण्यासाठी आर्किटेक्ट, स्ट्रक्चर इंजिनियर, बांधकाम निरीक्षकांना पालिकेत जावे लागते. त्यात अनेकदा अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस’ ही प्रणाली विकसित केली. त्याद्वारे बांधकाम परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले की, बीपीएमएस प्रणाली सुरू करण्याबाबत शासनाने पावले उचलली आहेत. रत्नागिरीत येत्या 15 दिवसांत अत्याधुनिक पध्दतीने इमारत बांधकाम नकाशे मंजूर करण्याची ऑनलाईन पध्दती कार्यान्वित करण्यात येणार आहे.

वास्तुविशारद ऑनलाईनद्वारे पालिकेकडे बांधकाम प्रस्ताव सादर करेल. भारनिरीक्षक सर्व कागदपत्रांची छाननी करण्याची कार्यवाही करेल. हा प्रस्ताव नगररचनाकारांकडे गेल्यानंतर प्रस्तावातील तांत्रिक बाबी तपासण्यात येतात. नकाशा, एफएसआय, साईड मार्जिन बरोबर आहे का, विकास आराखडय़ाप्रमाणे त्याचे बांधकाम आहे का आदी बाबी नगररचनाकार तपासतात. त्यांच्या शिफारशीनंतर बांधकाम परवानगीवर मुख्याधिकाऱयांची अंतिम स्वाक्षरी होत असते. आता हे सर्व टप्पे ऑनलाईन प्रणालीतून पार पडणार आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रणालीमुळे सादर केलेला प्रस्ताव कुठे, कोणाकडे प्रलंबित आहे आणि किती दिवसांपासून आहे हे समजणार आहे. ऑनलाईन नोंदी असल्यामुळे विशिष्ट हेतू ठेवून बघतो, करतो अशी उत्तरे यापुढे अधिकाऱयांना देता येणार नाहीत. बांधकाम परवाना देण्यासाठी यापूर्वी होणाऱया अनेक चुकीच्या गोष्टींनाही या पध्दतीमुळे पायबंद बसणार आहे. शिवाय बांधकाम परवाना 30 दिवसांत देण्याचे बंधन पालिका प्रशासनावर असणार आहे.

संबंधितांना प्रक्षिक्षण मार्गदर्शन सुरु

‘बीपीएमएस’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी काही मुलभूत गोष्टींवर काम होणे गरजेचे होते. प्रशासकीय पातळीवर हे काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. ऑनलाईन बांधकाम परवाना देण्यासाठी नगर परिषद स्तरावर प्रशासन सज्ज झालेले आहे. त्याबाबत आर्किटेक्ट, स्ट्रक्चर इंजिनियर, बांधकाम निरीक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जात आहे.

(अरविंद माळी, मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद)