|Friday, January 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जातपात नव्हे तर ‘ब्रँड मोदी’च प्रभावी

जातपात नव्हे तर ‘ब्रँड मोदी’च प्रभावी 

अहमदाबाद

गुजरात तसेच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून  विजयमोहीम सुरूच ठेवली आहे. विशेषकरून गुजरातमधील विजय भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता महत्त्वाचा ठरला. गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार करून भाजपसमोर आव्हान निर्माण केले, परंतु मोदींनी वैयक्तिक करिष्म्याच्या बळावर गुजरातमध्ये भाजपला सत्ता प्राप्त करून दिली. हिमाचलात अपेक्षेप्रमाणे सत्ताबदल होऊन भाजपला बहुमत मिळाले.

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला मिळालेल्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आणि विकासाचे धोरणच प्रभावी ठरल्याचे सिद्ध केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसकडून मोदी आणि त्यांच्या विकासाला कठोर आव्हान मिळाले असले तरीही अखेरीस विजय ‘ब्रँड मोदी’चाच झाला. निवडणुकीत जात तसेच धर्माची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला, परंतु निकालातून ब्रँड मोदींसमोर इतर सर्व गोष्टी व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट झाले.

गुजरातमध्ये मागील 3 निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री असताना लढल्या गेल्या. ज्यात मोदींनी मुख्यत्वे विकासाचा मुद्दाचा प्रचारात राखला होता. मोदींचे गुजरात मॉडेल मागील लोकसभा निवडणुकीत देखील यशस्वी ठरले आणि हे मोदी ब्रँड ठरले. भरले मोदी आता पंतप्रधान असले तरीही गुजरातची निवडणूक त्यांची प्रतिमा आणि विकासाच्या मुद्यावरच लढविली गेली. विजयातून जनतेने पुन्हा एकदा ब्रँड मोदीवर शिक्कामोर्तब केल्याचे उघड झाले. 

विजयात मोदींच्या वैयक्तिक प्रतिमेला विशेष महत्त्व आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून मोदींच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाला असता भाजपने याला निवडणुकीचा मुद्दा केले. यामुळे अखेरच्या काळात काँग्रेसला राजकीय नुकसानच झेलावे लागले तर भाजपला जनतेची सहानुभूती मिळाली. मोदींवर वैयक्तिक टिप्पणी करणे काँग्रेसला महागात पडले, अन्यथा काँग्रेसला आणखी काही प्रमाणात यश मिळू शकले असते.

जीएसटी लागू झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. जीएसटीमुळे नुकसान झेलावे लागण्याची भीती भाजपला होती. गुजरातमध्ये व्यापारी वर्ग प्रभावशाली असून तो भाजपचा पाठिराखा राहिलेला आहे. परंतु ज्याप्रकारे सुरतमध्ये भाजपचा विजय झाला, त्यातून जीएसटीने पक्षाला कोणतीही हानी पोहोचविलेली नाही असे म्हणता येईल. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीतील दिमाखदार विजयाने मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर मोहोर उमटविली,  गुजरातच्या निकालाने सरकारसाठी नव्या आर्थिक सुधारणांच्या दिशेने पावले टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसने गुजरातमध्ये जातीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे भाजपवरील दडपण देखील वाढले होते. याचमुळे दोन्ही पक्षांकडून जातीय आधारावरच तिकीटवाटप झाले. काँग्रेसने 41 पाटीदारांना तर भाजपने 40 पाटीदारांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने 62 तर भाजपने 58 ओबीसी उमेदवार दिले होते. काँग्रेसने 14 तर भाजपने 13 दलितांना तिकीट दिले होते. परंतु काँग्रेसचे सोशल इंजिनियरिंग विशेष प्रभाव पाडू शकलेले नाही.

या निवडणुकीत धर्माचा मुद्दा फारसा प्रभावी ठरलेला नाही. भाजपला हिंदुत्वाचा मुद्दा वापरता येऊ नये यासाठी राहुल गांधी राज्यातील 26 मंदिरांमध्ये गेले. काँग्रेस हिंदूविरोधी नसल्याचा यातून संदेश देण्याचा प्रयत्न झाला. अहमद पटेल यांच्या अल्प सक्रीयतेने काँग्रेस निवडणुकीला हिंदू-मुस्लीम रंग देऊ इच्छित नसल्याचे दाखवून दिले.

Related posts: