|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ातील जवळपास एक लाखापेक्षा अधिक कुंटुंबांना कर्जमाफीचा लाभ

जिल्हय़ातील जवळपास एक लाखापेक्षा अधिक कुंटुंबांना कर्जमाफीचा लाभ 

प्रतिनिधी/ सांगली

  राज्यातील शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आणण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष कारवाई गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यामध्ये जिल्हय़ातील शेतकऱयांची कर्जमाफी झालेल्या चार यादय़ा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये एकूण एक लाखापेक्षा अधिक कुंटुंबांना कर्जमाफीचा लाभ प्राप्त झाला आहे. जवळपास 300 कोटीची कर्जमाफी जिल्हय़ाला प्राप्त झाली आहे. अजूनही 50 हजार कुंटुंब या कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हय़ातील एकरक्कमी कर्जमाफी होणाऱया कुंटुंबांची संख्या कमी आहे. तर प्रोत्साहन अनुदान घेणाऱया शेतकऱयांची संख्या जास्त आहे.

शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या मोठया आंदोलनाचा परिणाम तसेच विरोधी पक्षाने सातत्याने सरकारला धारेवर धरल्याने राज्य शासनाने कर्जमाफीसाठी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. जून महिन्यात या योजनेची पाळेमुळे रूजली आणि त्यानंतर शासनाकडून याची अधिकृत माहिती देण्यात आली. दिवाळीनंतर प्रत्यक्षात कर्जमाफी होवून दिवाळीच्यानंतर एक महिन्यात सर्वच शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकऱयांना जवळपास 900 कोटीची कर्जमाफी मिळेल अशी आशा निर्माण झाली. पण शासनाने या योजनेत अनेक अटी तसेच शर्ती घातल्या आणि या योजनेत सातत्याने बदल केले त्यामुळे जिल्हय़ाला जवळपास 900 कोटीची कर्जमाफी होणार होती ती फक्त आता 400 कोटी इतकीच होण्याची शक्यता आहे. कारण जिल्हय़ात सध्या चार यादय़ा आल्या आहेत. यामध्ये एकूण 300 कोटीची कर्जमाफी आली आहे. एकूण एक लाख 20 हजार शेतकऱयांची नावे आली आहेत. पण यातील 20 हजार शेतकऱयांच्या नावांच्याबाबतीत अजूनही संभ्रमवस्था असल्याने प्रत्यक्षात 1 लाख शेतकऱयांनांच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून तो 300 कोटी इतका आहे.

 दिवाळी झाल्यानंतर  30 ऑक्टोबरपासून ही कर्जमाफी प्रत्यक्षात सुरू झाली.  बँकांकडून शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्यानंतर त्यांचे कर्जखाते निरंक झाल्याचा दाखला त्या शेतकऱयांना  देण्यात येणार आहे. शासनाने आयसीआयआयसीआय बँकेकडून सर्व बँकांना पैसे पाठविण्यास तातडीने प्रारंभ केला  पण पहिल्या यादीत फक्त जिल्हय़ातील 1347 शेतकऱयांची कर्जमाफी झाली त्यानंतर दोन आठवडय़ाच्या प्रतिक्षेनंतर दुसरी यादी प्राप्त झाली. पण त्यातील अनेक शेतकऱयांना मात्र तातडीने लाभ मिळाला नाही. त्यामुळे या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उभा राहिले होते. पण त्यानंतर मात्र शासनाकडून तातडीने निधी येवू लागला आणि जिल्हा बँक, तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडे शासनाकडून पैसे जमा झाले.

   राज्यातील एकूण 77 लाख शेतकरी कुंटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील जवळपास  एक लाख 82 हजार कुंटुंबानी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. फक्त दीड लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱया शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्य़ानंतर यावर अनेक वादविवाद झाले होते. आणि या कृषि सन्मान योजनेत अनेक बदल करून ही कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. यासाठी शेतकऱयांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम प्रत्येक वैयक्तिक शेतकऱयांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर शासनाकडून पुन्हा या नियमात बदल केला आणि त्यांनी वैयक्तिक अर्ज  न दखल करता फक्त कुंटुंबांनी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर पुन्हा हे अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये जवळपास जिल्हय़ातील एक लाख 82 हजार कुंटुंबांकडून कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्यात आले.

जिल्हय़ात दीड लाखापर्यंत थकीत कर्ज असणाऱया शेतकरी असे

जिल्हय़ात दीड लाखापर्यंत कर्ज थकीत असणारे शेतकरी 50 हजार 165 इतके आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही जत तालुक्यातील आहे. जत तालुक्यातील 13 हजार शेतकऱय़ांचा यामध्ये समावेश आहे. तर सर्वात कमी संख्या ही शिराळा तालुक्यातील आहे एक हजार 835 शेतकरी याठिकाणी आहेत. या दीड लाखापर्यंत कमी कर्ज असणाऱया शेतकऱयांना कर्जमाफी मिळणार आहे. पण यापेक्षा अधिक कर्ज असणाऱया शेतकऱयांना कर्जमाफी देताना अनेक निकष घालण्यात आले आहेत. तसेच सन 2015-16 आणि सन 2016-17 मध्ये नियमित कर्जपरत फेड करणाऱया शेतकऱयांनाही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच एक रक्कमी कर्ज भरणाऱया शेतकऱयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे उर्वरित 50 हजार शेतकरी आपली कर्जमाफी कधी होते त्या प्रतिक्षेत आहेत.