|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » घोडचूक केल्यास याद राख

घोडचूक केल्यास याद राख 

प्रतिनिधी/ सातारा

झी मराठी वाहिनीवरील संभाजीराजे या मालिकेतून राजेशिर्के घराण्यासह अन्य घराण्यांची निंदानालस्ती सुरु होती. या आक्षेपाहर्य़ मुद्यावरुन महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. शिवाय थेट न्यायालयात जावू असा इशाराही दिला होता. या भूमिकेला दिवसेंदिवस वाढते समर्थन मिळत होते. या आक्षेपाहर्य़ मुद्यावरुन राजेशिर्के, सुर्वे व अन्य कुळातील महाराष्ट्रातील घराणे एकवटली होती. नागपूरपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते बडोद्यापर्यंत परिणामी संतापाचे वातावरण तापत असताना अखेर संबंधित मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी थेट सातारा येथील ऍन्टीक या निवासस्थानी येवून संवाद साधला. जो प्रकार घडला तो अनावधानाने झाला असल्याची कबुली देत दिलगिरीही व्यक्ती केली आणि न्यायालयात न जाण्याची विनंतीही गंगावणे यांनी केली. या चर्चेवेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

सुहास राजेशिर्के यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत जाज्वल्य असा आहे. सर्व जाती समुहांबाबत कमालीचा जिव्हाळा आणि आदरभाव स्वराज्य कार्यप्रणालीत या दोन्ही छत्रपतींचा होता, असे असताना झी वाहिनीवरील संभाजीराजे मालिकेच्या माध्यमातून राजेशिर्पे, सर्वे घराण्याबाबत का अवमानकारक दृष्य दाखवली जातात हे कळून येत नव्हते. बर, या घराण्यांचे छत्रपती घराण्याशी मामा भाच्याचे ऋणानुबंध असताना या इतिहासचा विपर्यास केला गेला. म्हणून या चुकीच्या इतिहासाबाबत आवाज उठवणे गरजेचे होते. खरेतर, हे कर्तव्य जसे इतिहासतज्ञाचे वा अभ्यासकांचे जे आहे तसेच आपलेही आहे. कारण, आज महाराष्ट्रभर, देशभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक नाटके होत आहेत. चित्रपट निघत आहेत. विपुल असे लिखाण होत आहे. परंतु यातले सत्य या इतिहासाला धरुन किती आहे आणि कल्पनाविलास किती आहे? याचा फारसा कोणी विचार करत नाही. नाटकात, चित्रपटात, कादंबरीत एखादे पात्र दाखवले आहे म्हटल्यावर आपणही ते खरे मानू लागतो. त्याकडे आपण चिकित्सक वा वस्तुनिष्ठ पद्धतीने पहात नाही. त्यामुळे आजवर इतिहासाचा विपर्यास झालेला दिसतो.

झी वाहिनीवरुन प्रसारित होत असलेल्या संभाजीराजे यांसारख्या मालिकांची गरज आहे. नव्या पिढीला इतिहासाचे आकलन झाले पाहिजे. स्वराज्य निर्माणाच्या लढाईतील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शौर्यगाथा तरुणांना समजायला हवी. त्यातून नव्या पिढीला प्रेरणाही मिळायला हवी. परंतु हे करत असताना इतिहासाला निंदानालस्तीचा वेगळा रंग देवून छत्रपतींच्या देदीप्यमान इतिहासाला बाधा कोणी पोहचवू नये, ही मालिका दाखवताना लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांनी काळजी घ्यावी, आणि नवी पिढी घडावी, असाच इतिहास दाखवावा. नव्या पिढीच्या मनात तेढ किंवा कोणत्या तरी घराण्याविषयी द्वेषभावना निर्माण होईल, अशी घोडचूक यापुढे करु नये, अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही. या एकूणच प्रकाराबद्दल कुलस्वामिनी शिरकाई देवी मंडळाचे अध्यक्ष रविंद्रनाथ राजेशिर्के, सरचिटणीस सुनील राजेशिर्के, कार्याध्यक्ष निशांत राजेशिर्के, पुणे येथील प्रदीप राजेशिर्के, शिवसिंह राजेशिर्के, बडोद्याचे चंद्रकांत राजेशिर्के, नागपुरचे आनंद राजेशिर्के, कोकणचे संजय राजेशिर्के, संदीप राजेशिर्के, सुधीर राजेशिर्के, विनायक राजेशिर्के, कोंडमळा येथील संतोष राजेशिर्के, वेहळेतील चंद्रसेन राजेशिर्के, डेरवणचे कोंडिबा राजेशिर्के, तळसरचे दत्ता राजेशिर्के यांच्या भूमिका विचारात घेवून पुढील पावले उचलली जाणार आहेत. असे सुहास राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.