|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शाहुपूरीत आता ग्रामसुरक्षा दल

शाहुपूरीत आता ग्रामसुरक्षा दल 

सिद्धार्थ सालिम/ शाहुपूरी

सातारा तालुक्यातील 194 गावांमध्ये मोठय़ा लोकसंख्येच्या गावापैकी एक गाव म्हणून शाहूपुरीकडे पाहिले जाते. हे गाव सातारा शहरालगतच असल्याने तसेच सेवानिवृत्तांचे गाव म्हणूनही दुसरी ओळख आहे. अलिकडच्या काही दिवसात शाहुपूरी ग्रामपंचायतींच्या हद्दीत गुह्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱयांचे प्रकार घडू लागले आहेत. हे घडू नयेत, सामाजिक सलोखा राहावा यासाठी दस्तुरखुद्द शाहुपूरी पोलीस ठाण्याचे कारभारी किशोर धुमाळ यांनी शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामसुरक्षा दल स्थापन केले आहेत. यामध्ये युवकांचा सहभाग असून प्रत्येक वॉर्डात एक दल आहे. हे दल रात्री त्या वॉर्डात गस्त घालणार आहे. कोणत्या दिवशी कोणाचा नंबर याची माहिती व आदेश स्वतः धुमाळ हे ग्रुपमध्ये देणार आहेत.

 सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध अपार्टमेट, सोसायटय़ा तसेच कंपन्याही आहेत. वाढते शहरीकरणाचे परिणाम दिसत असल्याने गुह्यांचे प्रमाणही अलिकडच्या काही दिवसात घडू लागले आहे. खून, मारामाऱया, चोऱया यासारख्या घटना घडू लागल्या. त्यामुळे शाहुपूरी ग्रामपंचायतीचा परिसरही संवेदनशील बनू लागला आहे. यावर तोडगा म्हणून शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी शाहुपूरीतील मान्यवर मंडळीशी चर्चा करुन प्रत्येक वॉर्डात ग्रामसुरक्षा दल सुरु करण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यानुसार ग्रामस्थांनीही लगेच होकार दिला. त्या ग्रामसुरक्षा दलात वॉर्डातील पोलीस मित्र असलेल्या युवकांना सहभागी करुन घेतले जाईल. प्रत्येक वॉर्डाचा एक ग्रुप केला जाईल, त्यावरुन ग्रुपमधील सर्व सदस्यांना सुचना केल्या जातील, ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना पुढे ओळखपत्रही देण्यात येणार आहे. रात्री 11.30 ते पहाटे पाचपर्यंत वॉर्डात ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त घालयाची आहे. आपल्या वॉर्डात कुठे संशयास्पद आढळून आल्यास लगेच पोलिसांना कळवायचे आहे. अनुचित प्रकार घडत असल्यास त्यावर आळा बसेल. पहिल्याच बैठकीला पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील,  उपसरपंच शंकर किर्दत, रवींद्र राजपुरे, मंदार पुरोहित, अमित कुलकर्णी, कुंभार हे उपस्थित होते.

ग्रामसुरक्षा दल पोलिसांचाच एक घटक

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. या दलाचे सभासदांना आपण पोलिस प्रशासनास कशाप्रकारे सहाय्य करायचे याच्या सुचना दिल्या आहेत. ग्रामसुरक्षा दल हा पोलिसांचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे हद्दीतील कोणताही अनुचित प्रकारास पायबंद होणार आहे. रात्रीच्या वेळी हे दल जास्त प्रमाणात कार्यरत असले पाहिजे. कोणताही अनोळखी व्यक्तीचा वावर दिसल्यास पोलीस प्रशासनास कळवावे.

किशोर धुमाळ शाहुपूरी पोलीस निरीक्षक

गावच्या दृष्टीने महत्वाची बाब

आमचे गाव शांत आहे. सर्व सोसायटयांमध्ये सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ मंडळीच असतात. तरुणवर्ग कामानिमित्त असतो. ग्रामसुरक्षा दलामुळे कसाही अपप्रकार घडणार नाही. आमचे पोलिसांना सहकार्य राहिल. या दलामुळे गावाच्या हिताचीच बाब आहे.